पेठ तालुक्यात भुईमुग काढणीची लगबग; मजुरांना गावातच रोजगार

पेठ तालुक्यात भुईमुग काढणीची लगबग; मजुरांना गावातच रोजगार

कोहोर : पेठ तालुक्यात भुईमूग काढणीची लगबग सुरू झाली असून यामुळे परिसरातील नागरिकांना गावातच रोजगार मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पेठ तालुक्यात पाण्याच्या सुविधेच्या ठिकाणी उन्हाळी भुईमुगाच्या पट्ट्यात आता काढणीची धामधूम सुरू आहे. करोनामुळे परतीच्या मजुरांची गर्दी गावागावात अचानक वाढली आहे. या मजुरांच्या हातांना काम नसल्याने भुईमूग काढणीच्या कामांमुळे मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.

तालुक्यात पाण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची अनेक हेक्टरवर लागवड केली होती. सध्या उन्हाळी भुईमुगाचे पीक काढणीला आले असून शेंगा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भागातील मजुर रोजगारांच्या शोधात नाशिक, दिडोंरी, गिरणारे भागात नियमित जात होते. परंतु सध्या मजुर गावाकडेच असल्याने, गावातच रोजगार प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षी भुईमुगाच्या काढणीसाठी मजुरांची टंचाई शेतकऱ्यांना भासत होती. तेव्हा दूरवरच्या खेडेगावातून मजुरांना वाहनातून आणावे लागत असे. मजूरांची मिन्नतवारी केल्याशिवाय काढणीचा हंगाम पूर्णत्वास जात नसल्याने भुईमूग घेत असलेल्या शेतकरी चिंतेत होते होते. यंदा मात्र ही चिंता ‘करोना इफेक्ट’ मुळे संपुष्टात आली आहे.

भुईमूग शेंगासाठी मजुरांना सध्या दीडशे रुपये मजुरी देण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची भुईमूग खरेदी सुरू झाली असून, खरीप हंगामासाठी भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
– देवानंद टोपले, शेतकरी, हरणगांव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com