Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक-पुणे-मुंबई रेल्वेमार्गाचा सुवर्ण त्रिकोण; ‘त्र्यंबक-कसारा’चे काय?

नाशिक-पुणे-मुंबई रेल्वेमार्गाचा सुवर्ण त्रिकोण; ‘त्र्यंबक-कसारा’चे काय?

नाशिक । चंद्रकांत वाकचौरे
नाशिक-पुणे-मुंबई हा विकासाचा ‘सुवर्ण त्रिकोण’ असल्याने नाशिक-मुंबईप्रमाणेच नाशिक-पुणे ही महानगरे जवळच्या रेल्वेमार्गाने जोडावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. केंद्र शासनाने या 248 कि. मी. अंतराच्या लोहमार्गाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. या सुविधेमुळे नाशिक-पुणे रेल्वे प्रवास तब्बल अडीच तासात पूर्ण होणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे.

दरम्यान, आता या रेल्वेमार्गाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रश्नी खा. हेमंत गोडसे यांनी राज्य परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी नुकतीच चर्चा केली असून या लोहमार्गाला अवघ्या काही वर्षांत हिरवा कंदिल दाखवला जाण्याची अपेक्षा उंचावली आहे. या पार्श्वभूमीवर ही दोन महानगरे नव्या लोहमार्गाने एकमेकांना कमी अंतराने जोडली जाणार आहेत. अर्थात, उद्योग-व्यवसायाला चालना मिळणार आहे.

- Advertisement -

सध्या नाशिकरोड-मनमाड-येवला- कोपरगाव-श्रीरामपूर (बेलापूर), अ. नगर, दौंड-पुणे असा मोठा वळसा व नागमोडी वळणे घेत रेल्वेची ये- जा सुरू आहे. मात्र नवा प्रस्तावित लोहमार्ग नाशिकरोड- सिन्नर-दोडी-देवठाण-संगमनेर-अंभोरे-साकूर- बोटा-आळेफाटा-नारायणगाव-मंचर-चाकण-आळंदी असा झाल्यास प्रवास व मालवाहतुकीसाठी लागणारा विलंब व खर्चही कमी होणार आहे. शिवाय महामार्गावरील वाहनांची वर्दळ व वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. परिणामी अपघातांना आवर घातला जाईल. रेल्वेचे विकासमय जाळे पसरल्याने ठिकठिकाणी स्टेशननिर्मितीमुळे या परिसरातील उद्योग धंद्यांना नवी गती येणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरी व छोट्या-मोठ्या धंद्यांची समस्या सुटेल.

नाशिक-पुणे लोहमार्ग प्रस्तावाला लवकरच राज्य शासनाकडून मान्यता दिली जाणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केल्याने सोयीसुविधा सुलभरीत्या उपलब्ध होण्याचे सकारात्मक चित्र येत्या काही वर्षांत दिसणार आहे. याप्रश्नी खा. गोडसे यांनी लोकसभेत वेळोवेळी आवाज उठवला. परिणामी या कामाच्या प्राथमिक नियोजनासाठी 2017-18 च्या अर्थसंकल्पात 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. लोहमार्ग कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी साडेतेरा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र व राज्य शासन प्रत्येकी अर्धा खर्च करणार आहे.

या लोहमार्गाच्या प्रगतीबाबत काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येत्या तीन वर्षांत रेल्वे या ट्रॅकवरून धावेल, असे सांगितले होते. दरम्यान, आता उशिरा का होईना या लोहमार्ग कामाला गती येत आहे, हेही नसे थोडके..!

‘त्र्यंबक-कसारा’चे काय?
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर-कसारा तसेच त्र्यंबकेश्वर-डहाणू रेल्वेच्या जुन्या मागणीचे काय? यामुळे त्र्यंबकेश्वर-कसारा 60 तर त्र्यंबकेश्वर-डहाणू या 165 कि.मी.चा रेल्वे प्रवास सुलभ होऊन तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळेल.

नाशिक-पुणे प्रवास अडीच तासात पूर्ण होणार
नव्या लोहमार्गामुळे प्रवास व मालवाहतुकीचा वेळ, खर्च वाचेल
मुंबई- नाशिक-पुणे सुवर्ण त्रिकोण विकासित होईल
छोटी-मोठी गावे, महानगरांशी जोडली जाणार
रेल्वेस्टेशन निर्मितीमुळे परिसराचा विकास होईल
छोटे-मोठ्या उद्योग धंद्यांना चालना मिळणार

- Advertisment -

ताज्या बातम्या