सोने, वाहन बाजारात पुन्हा चैतन्य; ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

सोने, वाहन बाजारात पुन्हा चैतन्य; ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

नाशिक : लॉक डाऊनच्या चौथ्या पर्वाला सोमवारपासून प्रारंभ झाला. त्यानंतर करोनामुळे थांबलेला बाजार पून्हा सावरतोय. वाहन बाजारासह सराफ बाजार आणि इलेक्ट्रॉनिक दलनांमध्ये ग्राहक खरेदी करताना दिसले. सोमवारी (दि.१८) उच्चांकी पातळी म्हणजे ४९ हजार ३०० पर्यंत पोहचलेला दर मंगळवारी थोडा घसरून ४७ हजार ६८०(प्रति 10 ग्रामला)इतका झाला.

सोमवार(दि.१८) पासून ग्राहकांनी भर ऊन्हात खरेदीसाठी प्राधान्य दिल्याचे आश्‍वासक चित्र बाजारपेठेत दिसून आले. सुरक्षित शारिरीक अंतराचे भान ठेऊन मुखपट्या चेहर्‍यावर लावत ग्राहक चौथ्या पर्वातील लॉक डाऊनमध्ये खरेदीसाठी बाहेर पडताना दिसले. वाहन बाजारात व्यवसायास पूरक ठरणार्‍या चारचाकी वाहनांसाठी चौकशी अधिक झाली. इलेक्ट्रॉनिक बाजारातही ग्राहकांचे चैतन्य दिसून आले. वाढत्या गर्मीमूळे कूलरला मागणी वाढल्याचे माहिती दुकानदारांनी दिली.

करोनामुळे धास्तावलेले ग्राहक लॉक डाऊनच्या या टप्प्यात थोडेसे सावरत पुरेश्या सुरक्षित साधनांसह, योग्य शारिरीक अंतराचे नियम पाळत खरेदी करताना दिसलेे.  वाहनाच्या दालनातही येणार्‍या ग्राहकांच्या शरीराचे तपमान तपासत, हात सॅनिटायझरने निर्जंतूक करुनच मग आत प्रवेश दिला जात होता. अनेक दालनांनामध्ये ‘९८.५ फॅरेनाईटच्यावर तपमान असलेल्या ग्राहकांना प्रवेश नाही’ अशा स्पष्ट पाट्याही दिसून आल्या.

शहरातील सराफ बाजार मंगळवार बंद असतो. मात्र अनेक सुवर्ण पेढ्यांची दालने मंगळवारीही सुरू होती.

‘कोव्हीड’चा वाढता धोका ओळखून राज्य शासनाने पहिली टाळेबंदी जाहीर केल्यानंतर शहरात २० मार्च पासून सराफ बाजार बंद करण्याचा निर्णय नाशिक सराफ असोशिएशनने घेतला होता. त्या वेळी चोख सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४३ हजार ३०० इतका होता. लॉक डाऊनच्या चौथ्या पर्वातील पहिल्याच दिवशी (दि.१८) सोन्याने प्रति १० ग्रॅमला ४९ हजार ३०० इतका उच्चांक गाठला तर मंगळवारी त्यामध्ये घसरण होऊन तो प्रति तोळा ४७ हजार ६८०(जीएसटी सहित) रुपये इतका स्थिरावला.

वास्तविक शहरातील बाजारपेठा मंगळवारी बंद असतात. मात्र करोना संकटानंतर बाजारपेठेत असलेली आर्थिक मरगळ भरून काढण्यासाठी तसेच टाळेबंदीनंतरही विवाह, शुभकार्य मोजक्या लोकांसह करता येतात हे डोळ्यांसमोर ठेवत ग्राहक येतील या अपेक्षेने सराफ बाजारातील पेढ्या सुरू होत्या.

वास्तविक ११ मे नंतर सराफ बाजारासह गंगापूर रोड, कॅनडा कॉनर, कॉलेज रोडवरील दालने सुरू केली होती. मात्र चौथ्या पर्वात सोमवारपासून सराफ बाजारातील पेढ्यांचे थांबलेले अर्थ चक्र गतिमान होण्यास निमित्त मिळाले. सुरक्षित अंतराचे नियम पाळत सोने व्यापाऱ्यांनी ग्राहकी साधली. तब्बल दोन महिन्यांनी सोने बाजारात ग्राहकांचे चैतन्य दिसून आल्याने सराफांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. येत्या काही दिवसात ५० हजार रुपयांचा आकडा पार करेल असे अंदाज सराफांनी व्यक्त केले.

पहिल्या टाळेबंदीपासून प्रादेशिक परिवहन कार्यालये बंद होती. ती सुरू झाल्याशिवाय वाहनांची नोंदणी सुरू होणे शक्य नव्हते. मात्र सोमवार (दि.१८) पासून कार्यालये सुरु झाल्याने दुुचाकी, चारचाकी वाहनांचा बाजाराची ग्राहक प्रतीक्षा संपली. ३५ टक्के सेवकांना घेऊन काम करण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार वाहन दालनांमध्ये सुरक्षिचे नियम काटेकोरपणे पाळून ग्राहकांना विक्रीसाठी सेवा देण्यात येत होती. विशेष म्हणजे हौस, चैन म्हणूून चारचाकी घेण्यापेक्षा व्यवसायाला पूरक ठरेल अशा वाहनांची सर्वाधिक चौकशी केली. दुचाकी खरेदीसाठीही अनेकांनी चौकशी केली. बर्‍याच दिवसांनी सुरू झालेल्या दालनामुळे अनेकांनी आपल्या पूर्वी खरेदी केलेल्या चारचाकी, दुचाकींना सर्व्हिसिंगसाठी बाहेर काढले.

सोन्याला चांगला परतावा
लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. लॉक डाऊन असले तरी विवाह समारंभ कमी लोकांना घेऊन पार पाडले जातात. त्यामुळे सोन्याला चांगली मागणी आहे. शिवाय सोने खरेदीला गुंतवणूक म्हणून पाहिले जात असल्याने खरेदीत ग्राहकांचा उत्साह होता. बर्‍याच जणांनी आपल्याकडील सोने मोडून वाढलेल्या भावाचा परतावा ‘कॅश’ केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वाढलेल्या भावामुळे ग्राहकांना ५० टक्के अधिक परतावा मिळाला. चांदी बाजार तुलनेने शांत होता.

– मयूर शहाणे, संचालक मयूर अलंकार

अर्थ चक्राला गती
करोना टाळेबंदीनंतर अर्थचक्र रुतन बसले होते. आता सोन्याचा बाजार सुरू झाल्याने त्याला पुुन्हा गती मिळेल. आम्ही सुरक्षित सामाजिक अंतराचे काटेकार नियम पाळत ग्राहकी सुरू केली. सध्या लॉकडाऊन पूर्वीच्या ऑर्डर पूर्ण करुन देत आहोत. नवीन ग्राहकही येत आहेत. ‘रेड झोन’ मध्येदेखील ई-कॉमर्सद्वारे व्यापाराला परवाणगी देण्यात आली. त्यामुळे इमिटेशन दागिन्यांना चांगली ऑनलाईन मागणी येत आहे. एकूणच थांबलेल्या अर्थचक्राला आता गती मिळेल आणि लवकरच सराफ बाजार पूर्ववत होईल.
– शुभंकर टकले, संचालक टकले ज्युएलर्स.

लॉकडाऊन नंतर दालन सुरू झाल्यानंतर दोनच दिवसात ३२ ग्राहकांनी चारचाकी वाहनांसाठी चौकशी केली तर २ जणांनी गाडी बूक केली. व्यावसायिक दृष्टीकोनातून ग्राहक पिक-अप सारख्या वाहनांना अधिक पसंती देत आहेत. करोना संकटानंतर ऑटोमोबाईल क्षेत्र ६ महिन्यात पूर्ववत होेईल, याची आम्हाला आशा आहे, अशी माहिती त्र्यंबक रोडवरील महिंद्रा कंपनीच्या एका दालनातील व्यवस्थापकाने दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com