घोटीतही करोनाचा शिरकाव; आठ दिवस शहर बंद
स्थानिक बातम्या

घोटीतही करोनाचा शिरकाव; आठ दिवस शहर बंद

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजन करण्यात आला. त्यात घोटीतही बरीच खबरदारी घेण्यात आली होती. मात्र काल रात्री प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत घोटीतील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली.

यावरून घोटी शहरातही करोना विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. यावर खबरदारीचा उपाय म्हणून घोटी शहरातील रुग्ण राहत असलेला परिसर कंटेंटमेन्ट झोन म्हणून सील करण्यात आला.

तसेच इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे येथेही मुंबईहुन आलेला करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून परिसरातील बेलगाव कु-हे, गोंदेदुमाला, वाडीव-हे ही गावेही बंद ठेवण्यात आली. बेलगाव कु-हे येथे असलेला करोनाबाधित रुग्ण असल्याचे समजताच आरोग्य विभागाचे वैदयकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी धाव घेत संबंधितास जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.

घोटी शहरात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे समजताच प्रशासन, ग्रामपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली असून सकाळीच शहरात भरलेला बाजार तात्काळ बंद करण्यात आला. दरम्यान आगामी आठ दिवस १ जून पर्यंत घोटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान प्रशासनाने आवाहन करताच व्यापारी व भाजीविक्रेत्यांनी आपआपली दुकाने बंद केली.

घोटीत संशयित रुग्णाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह येताच स्थानिक ग्रामपालिकेने परिसरात सॅनिटायझर फवारणी केली. दरम्यान प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, प्रभारी सरपंच संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य यांनी कंटेन्मेंट झोन परिसरात भेट देऊन खबरदारीच्या पर्यायी उपाययोजनांची माहिती घेऊन स्थानिक यंत्रणेला त्याबाबत सूचित केले.

दरम्यान संपूर्ण घोटी शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याने खरेदीसाठी सकाळीच आलेल्या अनेक ग्राहक वर्गाला रिकाम्या हाती परतावे लागले. कडक लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील नागरिकांनीही घोटीत ये – जा करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

आरोग्ययंत्रणा व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून घोटीत संशयित आढळून आलेला ४५ वर्षीय रुग्ण करोनाबाधित निघाला. घोटी देवी मंदिर परिसरात राहत असलेला हा रुग्ण आरोग्य विभागात सेवेत आहे, धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत झालेल्या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान बाहेरगावाहुन आलेल्या संशयित रुग्णाच्या तो संपर्कात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते.

चार दिवसापूर्वी प्राथमिक अवस्थेत घोटी येथील एका खाजगी रुग्णालयात त्याने उपचार घेतल्याची चर्चा आहे. मात्र तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असून त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा आरोग्य विभागाकडून शोध घेतला जात असून त्याच्या संपर्कात आलेल्यांना करोंटाइन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com