सिन्नर : वावीच्या क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये ४८ जण दाखल

सिन्नर : वावीच्या क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये ४८ जण दाखल

सिन्नर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तेथील त्या रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येत असून अशा निगेटिव्ह अहवाल येणाऱ्या व्यक्तींना तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या क्वारेन्टाईन सेंटर मध्ये १४ दिवसांसाठी दाखल रहावे लागणार आहे. आज (दि.२०) सकाळपर्यंत वावीच्या क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये ४८ जण दाखल होते.

याशिवाय बाहेर गावाहून, कोरोना बाधित जिल्ह्यातून आलेल्या व होम क्वॉरेन्टाईन चा सल्ला धुडकवणाऱ्यांसह पोलिसांकडून संचार बंदीचे गुन्हे दाखल होणाऱ्यांना देखील याच सेंटरमध्ये राहण्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. तालुक्यात वावी, मुसळगाव व आगासखिंड येथे अशा प्रकारच्या क्वॉरेन्टाईन सेंटरची उभारणी करण्यात आली असून तेथे एकावेळी प्रत्येकी १५० जण राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत वावी येथील गोडगे पाटील स्कुलमधील सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून तेथे पाथरे येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या १३ जणांना दाखल करण्यात आले आहे. याशिवाय तालुक्यात तीन पोलीस ठाण्यांमध्ये संचार बंदी भंगाचे गुन्हे करणाऱ्या, कोरोना बाधित क्षेत्रातून अथवा परजिल्हयातुन गुपचूप येणाऱ्या ३५ जणांना देखील पाहुणचार देण्यात येत आहे. पोलिसांमार्फत येणाऱ्यांना पुढील १४ दिवस या ठिकाणी सक्तीने राहावे लागणार आहे.

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या नियंत्रणात ही क्वॉरेन्टाइन सेंटर्स शासनाच्या पुढील निर्देशापर्यंत सुरू राहणार आहेत. तिथे पाणी, दोन वेळचे जेवण, राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आली आहे.

महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून रुग्णाच्या संपर्कातील व संचारबंदी गुन्हे करणाऱ्यांना एकमेकांपासून बाजूला ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी नियमित आरोग्य तपासणी केली जात असून पोलिसांकडून नियमित गस्त घातली जात आहे. येथे दाखल असणाऱ्यांशीवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com