जिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश

Gokul Pawar

Gokul Pawar

 सिन्नर । सिन्नर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांसह नाशिक जिल्ह्यातील 12 तर राज्यातील 203 विद्यार्थी रशियातील किरगीझस्तान येथे अडकले असून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुंबईत विमान उतरवण्यास परावनगी मिळावी यासाठी आ. दिलीप बनकर व आ. प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून पालकांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

येथील सिल्व्हर लोटस् स्कूलचे संस्थापक दिलीप बिन्नर यांची कन्या रितुजा हिच्यासह स्नेहल रघुनाथ गोळेसर, संस्कृती तुषार बलक, शुभम नामदेव लोणारे,  ईश्‍वरी दत्तात्रय गडाख, हर्षद नवनाथ शिंदे (पांगरी) हे पाच विद्यार्थी रशियातील किरगीझस्तान येथील ओश स्टेट युनिर्व्हसिटीत एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसह गिरणारे, लासलगावसह जिल्ह्यातील 12 विद्यार्थी तर राज्याच्या विविध जिल्ह्यातील 203 विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. ‘कोरोना’ने रशियातही पाय पसरले असून या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वसतीगृहातील एका इमारतीत ठेवण्यात आले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी किरगीझस्तान ते मुंबई प्रवासासाठी विमान भाड्याचे पैसेही भरले आहेत. मात्र, भारतात विमान उतरवण्यास परवानगी नसल्याने या विद्यार्थ्यांना रशियातच अडकून पडावे लागले आहे. केंद्र शासनाने यापूर्वी इटली व इराण येथील विद्यार्थ्यांना खास विमानाने भारतात आणले असून आमच्या पाल्यांनाही भारतात आणण्यासाठी शासनाने विमान उतरण्यास परवानगी द्यावी असे साकडे या पालकांनी निफाडचे आ. दिलीप बनकर व इचलकरंजीचे आ. प्रकाश आवाडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घातले आहे.

नाशिक येथील डॉ. दिपेेश रसाळ हे किरगीझस्तान व महाराष्ट्र शासन यांच्यात समन्वय साधत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रशिया सरकार त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत असली तरी या विद्यार्थ्यांना भोजन, आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. मुंबईत विमान उतरवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com