सराफ बाजार बंद ठेवत ‘करोना’शी दोन हात
स्थानिक बातम्या

सराफ बाजार बंद ठेवत ‘करोना’शी दोन हात

Gokul Pawar

नाशिक ।  जिल्हा प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेवली. त्यामुळे नेहमी गजबजलेला सराफ बाजार सुनासुना असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्या शनिवारीदेखील सराफ बाजार बंद राहणार आहे.
करोना व्हायरस त्याच्या तिसर्‍या टप्प्यात असून देशासाठी पुढील पंधरा दिवस कसोटीचा काळ आहे.

या कालावधीत करोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. शिवाय महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य शासनाने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर ही शहरे लॉकडाऊन केली आहेत. नाशिकमध्ये एकही करोनाग्रस्त रुग्ण नसल्याची दिलासादायक बाब आहे.

जिल्हा प्रशासनाने करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल, पानटपर्‍या, चित्रपटगृहे, जीम, स्वीमिंग पूल ही गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सराफ बाजारदेखील बंद ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. सराफ व्यावसायिकांनीदेखील त्यास प्रतिसाद देत शुक्रवारी व उद्या शनिवारी सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. करोना हे जागतिक संकट असून गर्दी टाळण्यासाठी सराफी पेढ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवत सहकार्याची भूमिका घेतली आहे.

दिवसाला 50 कोटींची उलाढाल
सराफ बाजाराला पेशवेकालीन परंपरा आहे. जवळपास 1500 छोटी- मोठी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दिवसाला या ठिकाणी जवळपास 50 कोटींहून अधिक उलाढाल होत असते. जवळपास पाच हजार कारागिरांना सराफ बाजार रोजीरोटी देतो.

पाडवा सण तोंडावर आला आहे. मात्र करोनाचे संकट बघता गर्दी टाळण्यासाठी आम्ही दुकाने बंद ठेवली आहेत. सिडको, पंचवटी, नाशिकरोड व शहर हद्दीतील सराफा व्यावसायिकांनी त्यांच्या पेढ्या बंद ठेवल्या.
– चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफा असोसिएशन

Deshdoot
www.deshdoot.com