‘फास्टॅग’ रीड झाला नाही तर करता येणार मोफत प्रवास
स्थानिक बातम्या

‘फास्टॅग’ रीड झाला नाही तर करता येणार मोफत प्रवास

Gokul Pawar

नाशिक । राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर आजपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका आता फास्टॅग या इलेक्ट्रिक प्रणालीवर कार्यान्वित राहणार असून केवळ एक मार्गिका विनाफास्टॅग प्रवास करणार्‍या वाहनांसाठी असणार आहे. टोलनाक्यांवरून जाताना एखाद्या वाहनाचा फास्टॅग रीड झाला नाही तर असे वाहन व त्यातील प्रवाशांना संबंधित महामार्गावरून मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

टोलनाक्यांवरील फास्टॅग प्रणाली वाहनाच्या फास्टॅग कार्डचे यशस्वी स्कॅनिंग करून शकली नाही तर त्या वाहनाला टोल फ्री प्रवासाची परवानगी मिळेल, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई)च्या वतीने सांगण्यात आले. यासंबंधीची अधिसूचना न्हाईकडून काढण्यात आली आहे. टोलनाक्यांवर वाहनांना होणारा विलंब टाळण्यासाठी फास्टॅगचा पर्याय पुढे आला असून टोलनाके कॅशलेस होणार आहेत. फास्टॅगच्या वापरामुळे यापूर्वी वाहनांना टोल भरून पावती घेईपर्यंत टोलनाक्यावरच लांब रांगेत थांबावे लागत होते. यासाठी वेळदेखील अधिक लागत होता. मात्र यापुढे हा वेळ वाचणार असून फास्टॅग कार्डच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात वाहन नाक्यावरून मार्गस्थ होणार आहे.

आजपासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोलनाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली केली जाणार आहे. यासाठी सर्व मार्गिका इलेक्ट्रॉनिक प्रणालीने सज्ज करण्यात आल्या आहेत. तर फास्टॅग कार्ड नसणार्‍या वाहनांसाठी एक तात्पुरती मार्गिका असणार आहे. या मार्गिकेचा वापर करणार्‍या वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रकारचा वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असल्याचे न्हाईच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले असून टोलनाक्यांवर तसेच काही बँकांमार्फत हे कार्ड वाहनधारकास विकत घ्यावे लागणार आहे.

वाहनाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार्‍या फास्टॅग कार्डद्वारे संबंधित वाहनाला स्वतंत्र आयडी मिळणार आहे. तो वाहनमालकाच्या बँक खात्याशी संलग्न असेल. या बँक खात्यात किमान दहा रुपये शिल्लक असणे आवश्यक राहील. जर खात्यात ही किमान रक्कम नसेल तर तुमचे खाते ब्लॅक लिस्टमध्ये जाईल. फास्टॅग खात्यावरील पैसे संपले असतील तर भीम, गुगल पे, फोन पेसारख्या प्रणालीवरून तसेच टोलनाक्यावरील यंत्रणेची मदत घेऊन रिचार्ज करता येणार आहे.

सुरक्षा दल, पोलीस, सरकारी वाहनांनादेखील फास्टॅग
टोलनाका ओलांडणारी सरकारी वाहने, सैन्य, पोलीस दलासारख्या सुरक्षा यंत्रणांच्या वाहनांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तरीदेखील या वाहनांना फास्टॅग नोंदणी करावी लागणार आहे. सरकारी सेवक किंवा अधिकारी, सुरक्षा यंत्रणांचे जवान किंवा अधिकारी त्यांच्या वैयक्तिक वाहनांसह टोलनाका ओलांडू शकणार नाहीत यासाठी न्हाईने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोल आकारणार्‍या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. सुरक्षा दलातील सेवक, अधिकारी कर्तव्यावर असतील आणि सरकारी वाहनात असतील तरच त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही. मात्र या वाहनावरदेखील फास्टॅग असणे बंधनकारक राहील. फास्टॅग सुरू होण्यापूर्वी सरकारी सेवक, सुरक्षा यंत्रणांचे सेवक आपले ओळखपत्र दाखवून खासगी वाहनातून टोल न देता प्रवास करू शकत होते. आता मात्र फास्टॅग नसेल तर या सर्वांना रोख रक्कम भरून टोल नाका ओलांडावा लागणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com