शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। चंद्रकांत वाकचौरे
द्राक्षांचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड या चार तालुक्यांतील तब्बल 70 द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची तीन व्यापार्‍यांनी सुमारे 2 कोटी 42 लाख 46 हजार 301 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अ‍ॅग्रो एक्सपोर्टचे मालक व भागीदारांनी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांकडून द्राक्ष खरेदी केली; पण त्यांना द्राक्षमालाची रक्कम न देता पलायन केले. पिंपळगाव येथील रमेश खैरे व अन्य शेतकर्‍यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. एकूणच कधी निसर्गाचा लहरीपणा, कधी शासनाचे नाकर्ते धोरण तर कधी मानवनिर्मित कारस्थानांपुढे शेतकरी दिवसेंदिवस हतबल होत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती अन् ती कसणारा, राब-राबणारा बळीराजा अर्थात शेतकरी नेहमीच समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे वास्तव समोर येते. कधी अस्मानी तर कधी मनमानी शासकीय धोरणे अन् जटील नियमांच्या चौकटीत अडकून पडल्याने त्याला घामाच्या धारा गाळूनही अक्षरशः निराशामय जीवन जगणे भाग पडते.

त्याच्या वाट्याला कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ येतो, तर कधी लेकरासम जपलेल्या शेतमालाला अगदी कवडीमोल भाव मिळाल्याने तो हतबल होतो. शेतातील माल मिळेल त्या दराने विकल्यानंतर काही दिवसांनी त्याचे भाव भडकतात. बोटावर मोजण्याएवढे वगळल्यास अन्य शेतकरी सतत नापिकी, अल्प दर, कर्जबाजारीपणा आदी समस्यांना कवटाळत जीवन कंठतात. शेतमाल भाव खाऊ लागताच त्याची निर्यातबंदी करून आयातीचे निर्णय घेतले जातात. कांदा भाव खाऊ लागताच केंद्राकडून अशा एक ना अनेक उपाययोजना करण्यात आल्या. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्याला सहन करावा लागतो, कधी अगदी पिण्याच्या पाण्याची भ्रांत तर कधी शेतात पाणीच पाणी साचून पिकांची हानी होते. हेही नसे थोडके म्हणून की काय कुणास ठाऊक मानवनिर्मित अर्थात काही धूर्त व्यापारी निर्यातीच्या नावे शेतमाल खरेदी करतात, मात्र ठरलेल्या मुदतीनंतरही रक्कम देण्यास टाळाटाळ करतात. असे प्रकार आता शेतकर्‍यांसाठी नवे राहिले नाहीत. गेल्या आठवड्यात द्राक्षबागायतदारांची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाली. यापूर्वीही अशा एक ना अनेक घटना घडल्या आहेत.

मालेगाव व मनमाड भागातही गेल्या वर्षी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अशा पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. निफाड, दिंडोरी या द्राक्षाच्या पट्ट्यात अशा फसवणुकीच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. या गैरप्रकारांना पायबंद घालण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी कायदेतज्ञ व पोलिसांची मदत घ्यावी अन्यथा भविष्यातही अशा फसवणुकीचा फटका बसू शकतो, हे वास्तव नाकारून चालणार नाही हेच खरे!

Deshdoot
www.deshdoot.com