थर्टीफर्स्टसाठी उत्पादन शुल्क विभाग सज्ज
स्थानिक बातम्या

थर्टीफर्स्टसाठी उत्पादन शुल्क विभाग सज्ज

Gokul Pawar

नाशिक । नाताळ तसेच थर्टीफर्स्ट जोरदार साजरा करण्यासाठी तयारी सुरू असतानाच या कालावधीत परराज्यातून येणारे अवैध मद्य रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. यासाठी तपासणी नाक्यांसह भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

अवघ्या दोन दिवसांवर नाताळ तर पुढे आठवड्यावर थर्टीफर्स्ट येऊन ठेपला आहे. नाताळासह थर्टीफर्स्ट साजरा करणारा शहरात मोठा वर्ग आहे. किंबहुना दरवर्षी त्यामध्ये वाढच होत आहे. आयुष्यातून निसटणारे हे क्षण अलगद हृदयाच्या कुपीत जपून ठेवता यावेत यासाठी कुटुंबीय, मित्रमंडळींसमवेत साजरे करण्यास पसंती दिली जाते. नववर्षाच्या स्वागताला धम्माल करता यावी यासाठी घरी सेलिब्रेशन करण्याऐवजी शहरात किंवा शहराबाहेरील हॉटेल्समध्ये जाऊन आनंद साजरा करणारा वर्ग मोठा आहे.

अशा नागरिकांना थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचे विविध पर्याय उपलब्ध असतात. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील हॉटेल्सच्या वतीने त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आर्केस्ट्रा, फास्टफूड, मद्य, डिनरची व्यवस्था केली जात असल्याने लोकही त्याचा आनंद लुटण्यास पसंती देतात.

दुसरीकडे या कालावधीत परराज्यातून मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी होते. याचा मोठा परिणाम शासनाच्या महसुलावर होतो. तसेच बनावट मद्य याद्वारे विक्री होते. यातून पिणार्‍यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. म्हणून असे अवैध मद्य रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जय्यत तयारी केली आहे. विविध ठिकाणी भरारी पथके कार्यरत राहणार असून राज्य तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

भेसळयुक्त मद्यापासून सावध राहा
नाताळ व नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत बर्‍याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच) ‘ड्युटी फ्री स्कॉच’ नावाने बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीचे प्रकार घडले आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. त्याचबरोबर अशा मद्यसेवनाने आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा मद्य विक्रीपासून सावध राहावे तसेच असे प्रकार आढळल्यास तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा.
– अर्जुन ओहोळ, उपायुक्त, उत्पादन शुल्क

अशी सज्जता
अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अंबोली, हरसूल, रासबारी, बोरगाव या ठिकाणी 24 तास तपासणी नाके कार्यान्वित केले आहेत. या ठिकाणी 18 अधिकारी व सेवक कार्यरत राहणार आहेत. तसेच जिल्ह्याची तीन भरारी पथके तर विभागाची सहा पथके सातत्याने लक्ष ठेवून राहणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com