देवळाली येथील म्हसोबा यात्रेत यापुढे तमाशा होणार नाही; जाणून घ्या कारण

देवळाली येथील म्हसोबा यात्रेत यापुढे तमाशा होणार नाही; जाणून घ्या कारण

देवळाली कॅम्प : देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव गेल्या काही वर्षापासून भक्तांच्या गर्दीने फुलून जात आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रेत किमान अडीच ते तीन लाख भाविक हजेरी लावतात. परंतु आता तीन दिवसांची गर्दी बघता या यात्रेचा कालावधी वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या यात्रेला शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. एकेकाळी ही यात्रा संपूर्ण रात्रभर सुरू असायची. तसेच या यात्रेत तीन ते चार तमाशाचे फड असायचे. परंतु फुकटे व मद्यपींच्या त्रासामुळे हे तमाशे बंद झाले असून दोन वर्षांपासून या यात्रेतील तमाशा हद्दपार झाला आहे.

हा यात्रोत्सव जिल्ह्यात नावाजलेला आहे. या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, मिठाई, इलेक्ट्रिक पाळणे, विविध करमणुकीचे साधने आदींचा मोठा सहभाग असायचा. त्याचप्रमाणे या यात्रोत्सवात आठवडे बाजारात दोन ते तीन तमाशाचे फड उभारले जात होते. परंतु तमाशा कलावंतांना मद्यपी व फुकट्यांचा त्रास होऊ लागल्याने हळूहळू तमाशा येणे बंद झाले. काही काळानंतर उभे राहणारे तमाशाचे फड टाऊनहॉल येथे होऊ लागले. परंतु तिथेही कलावंतांना टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागायचे.

त्यातच गेल्या महिन्यात इगतपुरी तालुक्यातील एका यात्रोत्सवात टवाळखोर व मद्यपींनी तमाशा कलावंतांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे हे कलावंत आता बाहेरगावी जाण्यास घाबरत आहेत. पोलीसांचे संरक्षण मिळत नसल्याने या कलावंतांनी कला कशी सादर करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कलावंतांवरील हल्ल्यामुळे यंदाच्या वर्षी म्हसोबा यात्रोत्सवात तमाशा कलावंत फिरकलेसुद्धा नाही. त्यामुळे एकप्रकारे या यात्रेतून तमाशा हद्दपार झाल्याचे दिसून येते.

एकेकाळी या यात्रा रात्रभर सुरू असायची. परंतु पोलीस विक्रेत्यांना रात्री 11 वाजताच दुकाने बंद करण्यास सांगतात. यात्रेची मजा लुटण्यास नागरिक सायंकाळनंतर बाहेर पडतात. परंतु त्यांच्या आनंदावर पोलीसांकडून पाणी फेरले जाते. सध्या ही यात्रा तीन दिवस असली तरी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता हा कालावधी दोन दिवस वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी श्री म्हसोबा पंच कमिटीने पुढाकार घ्यावी, अशी परिसरातून चर्चा होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com