केवायसी अपडेट करताय जरा जपून; तपासणीच्या नावे होतेय फसवणुक
स्थानिक बातम्या

केवायसी अपडेट करताय जरा जपून; तपासणीच्या नावे होतेय फसवणुक

Gokul Pawar

नाशिक । पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली भामट्यांनी एका महिलेसह आठ जणांची 8 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये महिलेकडील पाच लाख 26 हजार तर सात जणांच्या बँक खात्यातील दोन लाख 86 हजार रूपयांचा सामावेश आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिडके कॉलनीतील बाजीराव नगर भागात राहणार्‍या महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि.6) अज्ञात भामट्यांनी पेटीएम अपडेटच्या नावाखाली त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यानंतर पेटीएम खाते अपडेट करताना वेगवेगळी कारणे सांगून त्याच्या मोबाईलवर आलेले वन टाईम पासवर्ड चोरट्यांनी घेतले. याआधारे सायबर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातील 5 लाख 26 हजार 110 रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन लांबविली. दुसरी तक्रार गोविंदनगर भागात राहणारे अभिजीत जयवंतराव शिंदे (रा. निकेतन अपार्ट.) यांनी दाखल केली आहे. गेल्या महिन्यात शिंदे यांच्याशी भामट्यांनी फोन व इंटरनेटच्या माध्यमातून सपर्क साधला होता.

यावेळी पेटीएम केवायसी अपडेट करायची आहे असे भासवून क्विक सपोर्ट, एनी डिस्क व अन्य असे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी व अन्य सहा तक्रारदारांच्या बँक खात्याची माहिती मिळवली. पुरेशी माहिती मिळाल्यानंतर चोरट्याने सात खातेधारकांच्या बँक खात्यांमधील दोन लाख 86 हजार रूपयांची रकम परस्पर काढून घेतली.

या प्रकरणी महिलेसह शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयटी अ‍ॅक्ट आणि फसवणुकीचे या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, झारखंड राज्यातील दुर्गम भागातून फसवणुकीचा उद्योग सुरू असल्याचा कयास सायबर पोलिसांनी व्यक्त केला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com