लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’; कलाकारांचा अनुभव भन्नाट
स्थानिक बातम्या

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’; कलाकारांचा अनुभव भन्नाट

Gokul Pawar

नाशिक : लॉक डाऊन काळात ‘घरी बसलेल्या दर्शकांसाठी, घरी बसून तयार झालेली मराठीतील पहिलीवहिली मालिका अशी र्टगलाईन असलेल्या सोनी मराठी वाहिनीच्या ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ कलाकृती तयार करताना आव्हाने मोठी होती. मात्र त्यावर यशस्वी मात करुन टाळेबंदीच्या काळात दर्शकांना हलकंफूलकं मनोरंजन देणार्‍या या मालिकेत काम करताना धमाल मजा आली असा अनुभव मालिकेतील चमूने ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले, अभिनेता संवाद लेखक समीर चौघुले, लीना भागवत, मंगेश कदम, लेखिका विभावरी देशपांडे, अजय भलावकर यांच्यासह थेट लंंडनहून सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांनी माध्यमकर्मींशी संवाद साधला.

गोडबोले म्हणाले, ताळेबंदीमुळे घरी बसलेला दर्शन करोनामुळे नकारात्मक झालेला आहे. त्यांचा तणाव दूर करण्यासाठी लॉक डाऊनच्या काळात अशा प्रकारची मालिका घरात बसून करायची असा विचार आला आणि याला मूर्त रुप दिले. यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, संकलन यांनी जगातील विविध भागातून योगदान देत हे शिवधनुष्य पेलले.

पहिल्या प्रयोगातून निघालेले हे मालिका रसायन दर्शकांना आवडेल याचा आम्हाला विश्‍वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कधी कधी सर्वत्र नकारात्मक घडताना सर्जनाला असे धुमारे फुटतात. यामध्ये आव्हाने प्रचंड होती. एकतर सर्वांचे मोबाईल विविध कंपन्यांचे होते. त्यांनंतर फुटेज अपलोड करणे, शुटिंग करणे, स्पॉटबॉय पासून ते अभिनेत्यापर्यंत सर्व भूमिका निभवने यासह बाहेरच्या आवाजाचाही प्रचंड त्रास होता मात्र आमच्या चमूने यावर यशस्वी मात करुन वात्रत चाळीतील ही अस्सल मनोरंजन करणारी मालिका तयार केली असे गोडबोले म्हणाले.

घरातील कामे करून सकाळी शुटिंग केले. आमची बेडरुम ग्रीनरुम झाली घरातील सर्वांना कामाला लावले आणि शुटिंग केले. यामध्ये धम्माल घडत होती ती ‘एन्जॉय’ करुन आम्ही आव्हानावर मात करत अभियन केला, असा अनुभव लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी सांगितला.

लेखिका देशपांडे यांनी या प्रकाराच्या पहिल्या मालिकेसाठी लिखाण करण्याचा अनुभव चांगला असल्याचे सांगून लॉकडाऊन काळात आपल्या आजूबाजूला, सोसायटतील बेरकी माणसे जाणून घेत त्यांना थोडे अधिक प्रहसनात्मक करुन मालिकेचे लेखन केल्याचे सांगितले. यातील अतरंगी पात्रे रंगवताना चेहर्‍यावर हास्य येईल, हे पाहिले आणि यातून धमाल कशी निर्माण करता याचा शोध घेऊन लेखन केले, असे त्यांनी नमूद केले.

सुव्रत आणि सखी यांनी मालिकेतील अभिनय अत्यंत वेगळा असून यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या हे सांगत बॅकस्टेज आर्टीस्टचे महत्व अनमोल आहें, असे सांगितले.
अजय भलवनकर म्हणाले.

तुम्ही दर्शकांना कशी मालिका तयार करुन देता यापेक्षा त्याचा‘कन्टेंट’ कसदार, मजबूत असायला पाहिजे असे सांगून अशा पद्धतीने मालिका घरी बसून तयार झाल्यानंतरही दर्शक त्यांना डोक्यावर घेतो असे सांगितले. पूणे, मुंबई, कोल्हापूर, केरळ यासह लंडनहून १६ कलाकारांसह बॅकस्टेज कलाकारांच्या चमूने मालिकेला मूर्त स्वरूप दिले. पत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन आणि समन्वयन प्रथमेश कुलकर्णी यांने केले.

येत्या काळात अशा प्रकाराच्या मालिका तयार होऊ शकतील कारण गरज ही शोधाची जननी आहे असेही मत कलाकारांनी व्यक्त केले. १७ मे पासूूून सोमवार आणि मंगळवारी रात्री १० वाजता सोनी मराठी वाहिनीवर ‘ आठशे खिडक्या नऊशे दारं’ दर्शकभेटीला येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com