गोदाघाट
गोदाघाट
स्थानिक बातम्या

गोदावरीच्या दोन्ही बाजूला आता ‘इको पार्क’; नमामी गंगे ‘पॅटर्न’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । केंद्र सरकारच्या नमामी गंगे या प्रकल्पाअंतर्गत आता दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या गेलेल्या गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पातून गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंच्या काठावर इको पार्कसह विविध पर्यावरणपूरक उपक्रम घेतले जाणार आहेत. याकरिता महापालिकेला यासंदर्भातील विशेष कृती आराखडा 20 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी 50 ते 100 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने देशातील प्रमुख नऊ नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘नमामी गंगे’ नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात आता नव्याने नाशिक येथून उगम पावणार्‍या गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय अलीकडच्या काही वर्षांत गोदावरी नदीचा उपस्थित झालेला प्रदूषणाचा प्रश्न आणि यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासन व महापालिकेला उपाय योजना करण्यासंदर्भात दिलेले निर्देश यामुळे केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयानेही प्रदूषण रोखण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन केली असून यामाध्यमातून आता उपाय योजना केल्या जात आहे.

यात विशेष काम निरी या संस्थेला माध्यमातून सुरू झाले असून या संस्थेच्या सूचनांनुसार विविध उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपाय योजना केल्या जात आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदा काठालगत गोदा प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढवली जात असून यासंदर्भातील आराखडा केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिकेनेही गोदावरी नदी स्वच्छतेसाठी केंद्राकडे मदतीची मागणी केली होती.

केंद्र सरकारने गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी नमामी गंगा प्रकल्पाअंंंतर्गत मदतीची तयारी होकार दिला आहे. याकरिता महापालिकेला 20 डिसेंबरपर्यंत आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. हा नवीन प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी उद्यान विभागप्रमुख तथा उपायुक्त शिवाजी आमले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

यानुसार उद्यान विभागाचे अधिकारी कामाला लागले आहे. यात सोमेश्वर ते अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत साधारण पाच किमी अंतरात गोदावरीच्या दोन्ही किनार्‍यावर काही पर्यावरणपूरक प्रकल्प राबाविण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला किनार्‍यावरील धूप थांबवण्यासाठी झाडे लावण्यासह इतर उपाय योजना केल्या जाणार आहे. यासाठीच इको पार्क व गॅबियन वॉल बांधण्याचे प्रस्तावित केले जाणार आहे. परिणामी गोदावरी नदी कायम प्रवाहीत होईल, असा दावा उद्यान विभागाकडून केला जात आहे.

मनपाकडून 100 कोटींचा आराखडा
केंद्र शासनाच्या नमामी गंगेच्या धर्तीवर गोदावरी नदी स्वच्छतेसाठी इको पार्क, गॅबियन वाल व इतर बाबी असलेला आराखडा महापालिका तयार करीत आहे. कृष्णा, तापी, नर्मदा यांच्यासह नऊ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा ज्या प्रमाणे मोठा निधी दिला जात आहे, याप्रमाणेच नाशिकच्या गोदावरी नदीस या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 50 ते 100 कोटींचा आराखडा पाठविला जाणार आहे. यात गोदा प्रदूषणमुक्तीसाठी सुमारे 100 कोटींपर्यंतचा निधी केंद्राकडून मिळण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com