उपनगर : द्वारका वाहतूक कोंडीतुन मुक्त पण टाकळी रोड ब्लॉक
स्थानिक बातम्या

उपनगर : द्वारका वाहतूक कोंडीतुन मुक्त पण टाकळी रोड ब्लॉक

Gokul Pawar

उपनगर : फेम चौकातून ट्रक, ट्रेलर, बाहेर गावावरून येणाऱ्या खासगी बसेस आदी अवजड वाहने वळवली. द्वारका चौक काही प्रमाणात सुटसुटीत झाला. मात्र रामदास स्वामी मार्ग ( टाकळी ) ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढले. अंतर्गत रस्त्यावर प्रमाणापेक्षा अधिक ताण वाढला.

द्वारका चौकात रोज होणारी कोंडी टाळण्यासाठी अहमदनगर, पुण्या वरून शहरात येणारी अवजड वाहने फेम चौकातून वळविण्यात आली. टाकळी रोड वरून ड्रीमसीटी मार्गे दिवे फार्म पुढे टाकळी घाटावरून औरंगाबाद महामार्गावर सोडली जात असल्याने द्वारका चौकात अवजड वाहनांची कोंडी फुटली. साधारण आठ दिवसापासून शहर वाहतूक विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात येऊन सकारात्मक प्रयोग दिसून आला.

द्वारका चौक सायंकाळी सुटसुटीत दिसतो. वाहतूक कोंडी सहसा होत नाही. पण दुखण्यावर इलाज भयंकर झाला, असा तक्रारी चा सूर टाकळी रोड परिसरातून ऐकू येतो. फेम चौकातून टाकळी कडे जाणाऱ्या समर्थ रामदास स्वामी मार्गावर उघडा पावसाळी नाला आहे. रस्त्या च्या मधोमध नाला, तो ही पूर्णपणे उघडा, त्यात भर धाव अवजड वाहनांची वाहतूक या दुष्टचक्रात येथील रहिवासी सापडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मोठमोठे ट्रक, कंटेनर, ट्रेलर, जीप, प्रवाशांनी खच्चून भरलेल्या खासगी बसेस व इतर अवजड वाहने रामदास स्वामी मार्गावरून अत्यंत भर धाव वेगाने धावतात.

वेगावर नियंत्रण हे चालकांच्या ध्यानात येत नसल्याने येथे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. तसे पाहिले तर हा एक प्रकार चा कॉलनी रोड आहे. कॉलनी रोड वर वाहन चालवताना वेग नियंत्रणाची मर्यादा ठरवून दिलेली असते. पण बाहेर गावावरून अवजड वाहने घेऊन येणाऱ्या चालकांना हा कॉलनी रोड आहे की हाय वे हे ध्यानात येत नसल्याने ऐंशी ते शंभर च्या स्पीड ने वाहने दमटली जातात. त्यात धूम स्टाईल पाळवणारे बाईक रायडर्स यांनी उच्छाद मांडल्याने आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या अगोदरच पोटात भीती चा गोळा उठला आहे.

अवजड वाहनाची वाहतूक रस्त्यावर वाढली, पण भर धाव वेगावर नियंत्रण साठी कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नाही. वाहतूक पोलीस येथे कायम उभे नसतात. अपघात होऊन येथे एखाद्या निष्पाप चा बळी जाऊ शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

रामदास स्वामी मार्गावर सध्या भर धाव वेगाने अवजड वाहने घातली जातात. पहाटे आणि सायंकाळी येथे फेरफटका घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गर्दी असते. कॉलनीतील लहान मुलं खेळताखेळता रस्त्यावर येतात. अवजड वाहनांना रोखवे कसे. परप्रांतीय चालकांना अनेक वेळा भाषा समजत नाही.
-दिलीप जाधव, रहिवासी, टाकळी रोड

Deshdoot
www.deshdoot.com