लॉकडाऊन : टाळेबंदीमुळे ग्रामीण भागांतही आता ऑनलाईन व्यवहारांवर भर

लॉकडाऊन : टाळेबंदीमुळे ग्रामीण भागांतही आता ऑनलाईन व्यवहारांवर भर

नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या बंदीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनीही ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार करू लागले आहेत. दैनंदिन वापरातील अन्नधान्यापासून ते बँकिंग व्यवहार, वैद्यकीय उपचारापासून ते अभ्यास, मनोरंजनापर्यंतचे विविध प्रकारचे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांच्या दिनचर्येतील, जीवनशैलीतील हा बदल लक्षणीय आहे.

सक्तीच्या बंदमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. लोकांना आपल्या घरात राहणे बंधनकारक बनले आहेत. मात्र घरी असूनही काही नित्याचे व्यवहार मात्र पार पाडावे लागतात. रोजच्या व्यवहारातील अनेक व्यवहार हे ऑनलाइन आणि डिजिटल पद्धतीने लोक करू लागले आहेत. अशा पद्धतीचे व्यवहार व्हावेत यासाठी शासनाने प्रयत्न केले असता अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता; पण आता मात्र असे व्यवहार कमालीच्या गतीने होऊ लागले असल्याचे निरनिराळ्या व्यवहारातून दिसत आहे. विशेषत: निम शहरी किंवा ग्रामीण भागात हे बदल ठळकपणे आढळतात.

घरपोच अन्नधान्य

दैनंदिन जीवनात धान्य, भाजीपाला हा अत्यावश्यक मानला जातो. यासाठी अनेक शहरे, गावांत किरकोळ दुकानदारांची प्रभाग निहाय संपर्क यादी बनवली आहे. त्यांच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अन्नधान्य आणि इतर साहित्याची मागणी नोंदवली की साहित्य दारी पोहचवले जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून गावगाडय़ातही ऑनलाइन व्यवहार झपाटय़ाने होऊ लागले आहेत. अगदी घरगुती सिलेंडरसाठी व्हाट्सअ‍ॅपवर वा लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) नोंदणी केली की घरपोच सिलेंडर मिळताे आहे.

शैक्षणिक नुकसानीची भरपाई

करोनाची बाधा टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. परंतु शालेय विद्यार्थ्यांंनी घरी बसून अभ्यास करावा लागत आहे. गृहपाठ, अभ्यास शिक्षकांना व्हाट्सअपद्वारे पाठवावा लागतो. त्यावर शिक्षक ही आवश्यक त्या सूचना करताना दिसत आहेत. मार्च ते मे या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाची अधिक तयारी करत असतो. सद्यपरिस्थितीत सक्तीच्या बंदच्या काळात सर्व बाबी ठप्प आहेत. यावर उपाय म्हणून अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पाठवण्यास सुरुवात केली आहे. एक आराखडा तयार करून त्यानुसार रोज विषयांचे (टॉपिक) चित्रफितीचे व्याख्यान (व्हिडिओ लेक्चर्स) पाठवले जातात.

आरोग्य सुविधा उंबरठय़ावर

करोनामुळे लोक आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. थंडी-ताप, सर्दी यांसारखे आजार होत असतील तर दवाखान्याकडे धाव घेत आहेत. मात्र काही ठिकाणी दवाखाने बंद आहेत. अशा वेळी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधला जात आहे. लक्षणे समजून घेऊन डॉक्टर व्हाट्सअ‍ॅपद्वारे औषध लिहून देत आहेत. हे औषध रुग्ण केमिस्टकडे पाठवत आहेत. अशा पद्धतीच्या ‘टेलीमेडिसीन’ पद्धतीला डॉक्टर आणि रुग्ण अवलंब करताना दिसत आहेत.

कामगारांची अपुरी सोय

कारखाने, उद्योग, व्यापार पूर्णत: बंद आहेत. कामगार घरी बसून असले तरी त्यांना पैशाची गरज भासत आहे. यासाठी कामगारांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविले जात आहेत. ग्रामीण भागातही ऑनलाईन बँकिंगचे प्रमाण वाढले असल्याचे समजते.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com