
नाशिक । कर्तव्य बजावून घरी परतलेल्या आडगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील हनुमाननगर भागात घडली. गेल्या तीन दिवसापासून या पोलीस कर्मचार्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सूर्यकांत मोहन गांगुर्डे (56 रा.पेशवा हॉटेल मागे, अमृतधाम, पंचवटी) असे चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झालेल्या पोलीस सेवकाचे नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले गांगुर्डे हे आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी (दि.12) सायंकाळी ते सेवा बजावून घरी परतले असता ही घटना घडली होती.
अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्यास दुखापत झाली होती. कुटुंबियांनी त्यांना तत्काळ नजिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. सलग तीन दिवस उपचार सुरू असतांना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान आजारपणामुळे काही दिवसापासून ते रजेवर होते. कामावर रूजू होताच ही घटना घडल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सी. एस. पाटील करीत आहेत.