देशदूत अभियान : अनुकरण केले तर, स्वच्छतेचा वास; सामाजिक भान काळाची गरज
स्थानिक बातम्या

देशदूत अभियान : अनुकरण केले तर, स्वच्छतेचा वास; सामाजिक भान काळाची गरज

Gokul Pawar

नाशिक । समाजात वावरताना आपल्याला सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. यातून आपली संस्कृती, संस्कार व सामाजिक जबाबदारी दिसून येते. रांगेची शिस्त पाळणे, मदत करणे, गरजू, मूकबधीर, दिव्यांग, वृद्धांंना मदत करणे, थुंकू नये यासह कचरा उचलणे, वाहतूक नियम पाळणे, वडीलधार्‍यांचा मान ठेवावा, हे आपले कर्तव्य आहे. हेच कर्तव्य करताना आज कुणीही दिसत नाही.

ते आपण केले तर, त्याचे अनुकरण दुसरा व्यक्तीही करेल. यातूनच ‘सामाजिक भान’ जपण्यास मदत होईल. ‘देशदूत’ने सामाजिक भान या माध्यमातून समाजात जनजागृती हा उपक्रम सुरू केला आहे. याबाबत तरुणांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदविल्या.

रांगेची शिस्त पाळणे गरजेची आहे. त्यातून इतरांनाही ही शिस्त सुविधानजक ठरणारी असून वेळेचे भानही कळेल. पेट्रोल घेण्यासाठी वाहनधारक आजसुद्धा रांगेची शिस्त पाळत नाही.
-मनोज गायकवाड, तरुण

वाहतूक नियमांंचे पालन करणे गरजेचे आहे. आपण सिग्नल सुटण्यापूर्वीसुद्धा शेवटचे 10 सेकंद वाट पाहू शकत नाही. लगेचच सिग्नल जम्प करून वाहतूक नियम मोडतो. त्यातून अपघाताला निमंत्रण मिळते.
-अ‍ॅड. यश भुजबळ, द्वारका

लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. सहभागी पाहुण्यांनी आवश्यक तितकेच अन्न घेतले तर त्याची नासाडी टळेल. तसेच शिल्लक अन्न भुकेल्यांनाही देता येईल. पाहिजे तितकेच अन्न घेतले तर ते वाया जाणार नाही.
केवल निमगावकर, विद्यार्थी

सार्वजनिक वा खासगी ठिकाणी बिनधास्त थुंकले जाते. यातून संसर्गजन्य आजार पसरण्यास मदत होते. यासाठी थुंकदाणीचा वा बेसिनचा वापर करावा.रस्ते, शासकीय कार्यालयांच्या भिंती, कोपरे, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पाहायला मिळते.
-शीतल जाधव, विद्यार्थिनी.

सध्याच्या तरुण पिढीने अनुकरणीय बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपण एखादी गोष्ट चांगली केली तर तिचे अनुकरण दुसरा व्यक्ती करेल. त्यामुळे समाजात आपली वागणूक, इतरांना मान सन्मान, मदत, सामाजिक जबाबदार्‍यांचे पालन योग्य राहील, या दृष्टीने वाटचाल आवश्यक आहे.
प्रा. नितीन डांगळे, मुख्याध्यापक

Deshdoot
www.deshdoot.com