कोरोनाच्या मदतकार्यात एनएसएसचे साठ हजार विद्यार्थी सहभागी होणार
स्थानिक बातम्या

कोरोनाच्या मदतकार्यात एनएसएसचे साठ हजार विद्यार्थी सहभागी होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीमुळे संचारबंदी आहे; तसेच ‘लॉकडाउन’मुळे बहुतांश व्यवहार बंद असल्याने सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासोबतच यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आणि नागरिकांना विविध गोष्टींसाठी मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील ६० हजार विद्यार्थी कार्यरत होणार आहेत.

हे विद्यार्थी प्रत्येकी १० गरजू कुटुंबांशी जोडले जाणार आहेत. त्याद्वारे तब्बल ६ लाख कुटुंबे आणि तब्बल २५ लाख लोकांपर्यंत हे विद्यार्थी जोडले जाणार आहेत. या संदर्भात कुलगुरू नितीन करमळकर यांनी संबंधित अधिकारी व सदस्यांशी चर्चा करून याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात संचारबंदीमुळे यंत्रणांना विविध कामे करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे.

विशेषत: ज्येष्ठ नागरिक व अनेक कुटुंबांना विविध प्रकारच्या गोष्टींसाठी मदतीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ६० हजार विद्यार्थी मदतीला उभे राहणार आहेत. हे विद्यार्थी विविध गोष्टींसाठी यंत्रणांना मदत करण्यात आहेत.

‘एनएसएस’चे ६०० कार्यक्रम अधिकारीही त्यात सहभागी होणार आहेत. या संदर्भात कुलगुरू प्रा. करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद यांचे काही सदस्य; तसेच एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी अशा तब्बल १०० जणांशी आज सायंकाळी ५ वाजता संवाद साधला.

त्यातून आलेल्या सूचनांनुसार हा ठोस कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वेळी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे; तसेच डॉ. प्रभाकर देसाई उपस्थि होते.

मुद्दे

१. जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण व्यवस्थेत यंत्रणांना मदत करणे. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणे.

२. सरकारकडून विविध वंचित घटकांसाठी बँकांमार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी बँकांमध्ये त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची मदत करणे.

३. वंचित घटकांना त्यांना मिळणारे लाभ त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मदत करणे.

४. पोलिस मित्र म्हणून काम करणे. पोलिसांच्या गरजेनुसार पोलिस ठाण्यांमध्ये किंवा त्यांच्या मदत केंद्रात सहकार्य करणे. त्यांना आवश्यक असेल ती मदत करणे व महसूल यंत्रणेसोबत जोडले जाणे.

५. या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदानासाठीच्या फिरत्या व्हॅन चालवणे. त्यासाठी यंत्रणांना मदत करणे.

सॅनिटायझर व मास्क निर्मिती

विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबतचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून पुरवले जाणार आहे. त्यावरून विद्यार्थी ही उत्पादने तयार करतील.

सध्या आरोग्यसेवकांना या गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे, भविष्यात त्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ही उत्पादने तयार करून आरोग्य सेवकांना पुरविण्याची जबाबदारीसुद्धा हे विद्यार्थी घेणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com