Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककरोनामुक्तीसाठी दिंडोरी झाले तंबाखु मुक्त; किराणा व्यापार्‍यांचा अनोखा उपक्रम

करोनामुक्तीसाठी दिंडोरी झाले तंबाखु मुक्त; किराणा व्यापार्‍यांचा अनोखा उपक्रम

दिंडोरी : करोनाचा प्रसार होवू नये, यासाठी दिंडोरी शहरात किराणा व्यापारी व  नगरपंचायतीने एकत्र येत सुमारे 90 हजारांच्या गुटखा, तंबाखू, मिस्त्री आदी अमली पदार्थाची होळी केली. थुंकीतुन करोनाचा संसर्ग होवू नये या उदात्त हेतूने  यासाठी सर्व किराणा व्यापार्‍यांनी तंबाखु मुक्त दिंडोरी करण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे.

दिंडोरी शहरात अजून करोनाचा शिरकाव झालेला नाही.  प्रतिबंधासाठी विविध प्रयत्न चालू आहे.

- Advertisement -

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यासह सर्व अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरुन कामे करीत आहे. करोनाचा संसर्ग थुंकीतुन होत असतो. थुकीसाठी कारणीभूत ठरणार्‍या तंबाखु, गुटखा, मिस्त्री या अमली पदार्थांची विक्री थोड्या फार प्रमाणात होत होती. कुणी थुंकून करोना संसर्गास कारणीभूत होवू नये, यांसाठी सर्व किराणा व्यापार्‍यांनी विचारविनिमय केला. दुकानातील तंबाखु, गुटखा, मिस्त्री, सिगारेट, विडी आदी पदार्थ एकत्रित जमा केले.

या सर्व पदार्थाची किंमत ९० हजार रुपयांच्या आसपास होती. येथील श्रीरामनगर येथे हे पदार्थ नेण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी दिंडोरी करोना संसर्ग मुक्त रहावे या नगरपंचायतीच्या प्रयत्नांना  किराणा व्यापारी असोशिएशनने साथ दिल्याबद्दल आभार मानले. दिंडोरी शहरातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सर्व नागरिकांना आणि व्यापार्‍यांनाही कायद्याच्या माध्यमातूनही सांगावे लागते.

याप्रसंगी राजेश बुरड, रवि जाधव यांनी व्यापार्‍यांची भुमिका स्पष्ट केली. करोणाचे वादळ संपेपर्यंत कोणाताही किराणा व्यापारी तंबाखुसह अन्य अमली पदार्थ विकणार नाही याची ग्वाही राजेश बुरड, रवि जाधव यांनी दिली.

यावेळी सामाजिक अंतर ठेऊन गुटख्यासह सर्व अमली पदार्थाची होळी करण्यात आली. यावेळी प्रशासन अधिकारी पोतदार, अभियंता पाटील, सचिन बोरस्ते, ईश्‍वर दंडगव्हाण, तानाजी निकम, सचिन जाधव यांसह व्यापारी असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

करोनाच्या प्रादुर्भावासाठी थुंकी हे एक महत्वाचे कारण आहे. तंबाखु, गुटखा, मिस्त्री यांचा वापर करणारे नागरिक अनेक वेळा कुठेही थुंकतात. त्यातून आरोग्य धोक्यात येऊ शकते, यासाठी तंबाखु जन्य पदार्थ न विकण्याचा निर्धार दिंडोरी किराणा संघटनेने केला.

त्यानुसार दुकानदारांनी दुकानातील माल एकत्रित नगरपंचायतीकडे जमा केला. त्याची होळी करण्यात आली. नगरपंचायत किराणा व्यापार्‍यांचे आभारी राहिल.
– डॉ.मयुर पाटील, मुख्याधिकारी नगरपंचायत दिंडोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या