सामाजिक भान उपक्रम : अन्न नासाडी टाळण्यासाठी जनजागृती हवी
स्थानिक बातम्या

सामाजिक भान उपक्रम : अन्न नासाडी टाळण्यासाठी जनजागृती हवी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | गोकुळ पवार : अन्न हे पूर्णब्रम्ह आहे असे आपण नेहमी म्हणतो. परंतु अन्नाचे महत्व आजही समाजाला पटवून देण्याची गरज आहे. येथील प्रत्येक माणूस दोन वेळची भूक भागवण्यासाठी काहीना काही प्रयत्न करत असतो. कारण अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. पंरतु लग्न समारंभ वा सार्वजनिक कार्यक्रमांतून होणारी अन्नाची नासाडी बघता हे अन्न भुकेल्यापर्यंत पोहचणं गरजेचं आहे. तसेच याबद्दल समाजात प्रबोधन होणं महत्वाचे आहे, असे वाटते. यावर अनेक उपक्रमातुन प्रकाश टाकला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे नाशकातील लायन्स क्लब ऑफ नाशिक फूड बँक आणि यावर काम करणारे विक्रांत जाधव यांच्याशी साधलेला संवाद

अन्न वाया गेल्याने कोणत्या गोष्टींवर परिणाम होतो?
साहजिकच भुकेल्यापर्यंत अन्न पोहचत नाही. भूकबळीची संख्या वाढते. अन्न फेकल्याने कचरा तयार होऊन स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर अन्न सडल्याने आरोग्यास हानी पाहोचते.

अन्न वाया जाते, यामागील कारणे?
घरात आणि लग्न समारंभात स्वयंपाकाचे कोणतेही नियोजन नसते. अधिक अन्न शिजवल्याने खराब होते, परिणामी फेकून द्यावे लागते. यातूनच आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच लोकांची मानसिकता यास कारणीभूत आहे.

अन्न वाया जाऊ नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत?
अन्न वाया जाऊ नये यासाठी प्रथमतः लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी लहान मुलांमध्ये अन्नाची नासाडी टाळण्याबाबत सवय करायला हवी, तसेच आईवडिलांनी देखील मुलांवर संस्कार करणे महत्वाचे आहे. तसेच महिलांनी निश्चित आणि नेमकेपणाचा स्वयंपाक करण्यावर भर द्यावा. भाजीपाल्याच्या सालीचाही उपयोग स्वयंपाकात करावा. अन्न जर उरलेच तर त्याच खत तयार होईल असा उपयोग करावा. हॉटेलमध्ये अन्नाची नासाडी टाळण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगास चालना देणे अत्यंत महत्त्वाचे होते.

फूड फेस्टिवल ही संकल्पना काय आहे?
लायन्स फूड बँकेच्या माध्यमातून दिनांक ८ ते १० फेब्रुवारी २०२० रोजी फूड फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा फूड फेस्ट लक्शिका मंगल कार्यालय सिटी सेंटर माल समोर लव्हाटे नगर येथे आयोजित केला जाणार आहे. ही खाद्यजत्रा सकाळी १० पासून रात्री ९ वाजे पर्यंत राहील. ह्या फूड फेस्टचे वैशिष्ठ्य आहे कि ४२ विविध खाद्य पदार्थांचे स्टाल्स लावण्यात येणार असून ४० स्टोल्स वर विविध प्रांतीय तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांमधील खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. तसेच फेस्टमध्ये आरोग्यवर्धक पाककृतींची शाळा, मिसळ सकाळ, आधुनिक पदार्थांचा मेळा अशा उपक्रमांचे आयोजन या फूड फेस्टिवलमध्ये करण्यात आले आहे.

नाशिककरांना काय आवाहन कराल?
साधारण १४ ते १५ टक्के नागरिक हे उपाशी झोपतात. यामुळे नाशिककरांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि, अन्न वाया गेल्याने किती लोकांवर याचा परिणाम होतो. त्यासाठी नेमका स्वयंपाक करावा. अन्नाची नासाडी करण्याऐवजी एखाद्या भुकेल्याला अन्न द्या. जेणेकरून शहरात या समस्येमुळे वाढणारी गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. तसेच हॉटेल किंवा लग्न समारंभात गेल्यास जेवढे खाणार आहात तेवढेच घ्या. स्वतःशी प्रामाणिक राहत अन्न वाया जाणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

शहरातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी लायन्स क्लब ऑफ नाशिक फूड बँक प्रयत्नशील आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जागरूक होणे अत्यावश्यक आहे. जेवढी गरज असेल तेवढंच घ्या. जेवण उरल्यास, परिसरातल्या गरजूंना द्यावं, अशी भावना प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे.

-वैद्य विक्रांत जाधव

Deshdoot
www.deshdoot.com