Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेशदूतच्या आरोग्य महोत्सवाला उमराण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

देशदूतच्या आरोग्य महोत्सवाला उमराण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

उमराणे। देशदूतच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त आयोजित महिला आरोग्य महोत्सवाला उमराणे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आरोग्य महोत्सव पार पडला. देशदूतकडून छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी देशदूतने हाती घेतलेल्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतूक केले.

देशदूतच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, पं. स. उपसभापती धर्मा देवरे, बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, माजी सभापती राजेंद्र देवरे, माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, बाजार समितीचे संचालक विलास ढोमसे, सरपंच बाळासाहेब देवरे, देशदूतचे महाव्यवस्थापक आर. के. सोनवणे व्यासपीठावर होते.

- Advertisement -

यावेळी डॉ. कुंभार्डे म्हणाले की, महिलांच्या आरोग्यासाठी देशदूत करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. एखाद्या वृत्तपत्राने महिलांच्या आरोग्याबाबत विशेषतः ग्रामीण भागात जाऊन राबविण्यात येत असलेल्या व्यापक मोहीमेची निश्चित नोंद घेतली जाईल. जिल्ह्याच्या जडणघडणीत देशदूतचे योगदान निर्विवाद आहे. विकासाच्या वाटा दाखवतानाच समाजाचे आरोग्य जपण्याचा हा प्रयत्न आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जाते, यासाठी अनेक योजना आहेत, त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. कुंभार्डे यांनी केले.

नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. रोहन देव यांनी महिलांसाठी व्यायामाचे धडे दिले. प्रसूती नंतर महिलांनी आवश्यक व्यायाम केल्यास भविष्यातील अनेक व्याधींना दूर ठेवता येते असे ते म्हणाले. नामको हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका हिवराळे यांनी महिलांनी ठराविक वयानंतर आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. यावेळी माजी सभापती राजेंद्र देवरे, उपसभापती धर्मा देवरे यांनी देशदूतच्या उपक्रमाचे कौतुक केले.

देशदूतचे जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने यांनी प्रास्ताविकात आरोग्य महोत्सवाची भूमिका मांडली. श्रीप्रकाश पाटील यांनी सुत्रसंचलन तर देशदूतचे उमराणे येथील प्रतिनिधी विनोद पाटणी यांनी आभार मानले.

आरोग्य महोत्सवासाठी सकाळपासूनच विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती. शिवाजी चौक गर्दीने फुलून गेला होता. दिवसभर अनेक महिलांनी विविध तपासण्या करुन घेतल्या. विद्यार्थिनी वजन, उंची, बीएमआय, रक्तदाब अशा प्राथमिक तपासण्या करुन घेण्यासाठी उत्साहाने पुढे आल्या.

नामको हॉस्पिटलचे फिजिओथेअरेपीस्ट डॉ.रोहन देव यांनी पाठ, मणके, खांदे व हाडांच्या विकारांवर उपचार व मार्गदर्शन केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका हिवराळे यांनी विद्यार्थिनी व महिलांची तपासणी केली. डॉ. उन्नती कुलकर्णी यांनी डोळ्यांच्या विकारांवर मार्गदर्शन करून तपासणी केली. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महेश बेंडकुळे, पुष्पा गाडगीळ, आशा रत्नपारखी, पूनम सोनवणे यांनी सहाय्य केले. जखडलेल्या सांध्यांमुळे बेजार झालेले अनेक रुग्ण तपासणीसाठी आले होते. डॉ.रोहन देव यांनी उपचार करून त्यांना दिलासा दिला.

बचत गटांची जत्रा
यावेळी बचतगट जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बचतगटांंनी सहभाग नोंदवला. खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर विद्यार्थिनींनी आनंद लुटला. बचत गटांच्या वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कृपासिंधू, श्री स्वामी समर्थ, सेवा सहाय्यता, शिवशक्ती स्वयं साहाय्यता, आदर, सरस्वती, आदर्श, ज्ञानेश्वरी महीला बचत गट जत्रेत सहभागी झाले होते.

सॅनिटरी नॅपकिन मशिन भेट
आरोग्य महोत्सवात छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलला देशदूतकडून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट देण्यात आले. देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के.सोनवणे यांच्या हस्ते उपमुख्याध्यापक सीमा सोनवणे व विद्यार्थिनींनी त्याचा स्विकार केला. शाळेत हे मशीन असावे ही केव्हा पासूनची इच्छा देशदूतने जाणली. यामुळे विद्यार्थिनींची आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय देवरे, सुनील देवरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, जनता विद्यालय, एस. पी. एच. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी, गावातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आरोग्य महोत्सवाच्या यशस्वितेसाठी देशदूतचे वितरण व्यवस्थापक ज्ञानेश्वर नागरे, अरुण गुरगुडे, विलास झगडे, वृत्तपत्र वितरक अनिल पाटणी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या