कृषी उपसंचालकास एक लाखाच्या लाच प्रकरणी अटक

कृषी उपसंचालकास एक लाखाच्या लाच प्रकरणी अटक

नाशिक : द्राक्ष निर्यातीसाठी फायटो परवाना देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच घेणार्‍या कृषी उपसंचालकास न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.5) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आघाव यांच्या घरी रोकड, सोन्याचे दागिने, डीमॅट खाते, शेअर्सचे कागदपत्रे, बँक पासबुक अशी लाखो रूपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.

नरेंद्रकुमार गोविंदराव आघाव असे अटक करण्यात आलेल्या कृषी उपसंचालकाचे नाव आहे. त्यांना मंगळवारी (दि.3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना द्राक्ष निर्यातदारांना द्राक्ष निर्यातीसाठी फायटो परवाना आवश्यक असतो. त्यासाठी द्राक्षनिर्यातदारांनी कृषी विभागाकडे परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी कृषी उपसंचालक आघाव यांनी परवाना देण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली.

याबाबत आघाव यांच्याविरोधात नाराजीचा सुर होता. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारी देखील करण्यात आल्या. आघाव यांनी तक्रारदारांकडे 1 लाख 64 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड करुन दीड लाख रुपये घेण्यास आघाव तयार झाले. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली. विभागाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी (दि.3) कार्यालयातच आघाव यांना लाचेची एक लाख रुपये स्विकारताना विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आघावविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोविंदनगर येथील आघाव यांच्या निवासस्थानाचीही रात्री उशीरापर्यंत झडती घेतली. त्यात दोन लाख रुपये रोख, दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, शेअर्सची कागदपत्रे, काही महत्वाची कागदपत्रे, पाच ते सहा बँक पासबुक आढळून आली आहेत. विभागाकडून या मालमत्तांची चौकशी होणार आहे. आज त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस आघाव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com