आला संक्रातीचा सण; भोगीच्या भाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी
स्थानिक बातम्या

आला संक्रातीचा सण; भोगीच्या भाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । सध्या मक्रर संक्रातीचे वेध लागले असून, संक्रातीच्या एक दिवस अगोदर भोगीचा सण साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने भाज्यांसह धान्यांचा आस्वाद घेण्याची पद्धत आहे.

मंगळवारी भोगी असल्याने त्यासाठी लागणार्‍या पापडी, वालवर, पावटा, गाजर, बोरे या भाज्यांची किरकोळ बाजारासह रविवार कारंजा, पेठरोड व अन्य भाजी मंडईत आवक वाढली आहे. या भाज्यांना मागणी वाढल्याने त्यांच्या दरांत काहीशी वाढ झाली आहे. शहराच्या विविध भागातील मंडईमध्ये भोगीसाठी लागणार्‍या हरभरा, वाटाणा, पापडी, वालवर, पावटा, बोरे, वांगी, मटार, शेंगदाणे, कांद्याची पात, गाजर, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे, मेथी यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

संक्रांतीसाठी गूळ, तीळ, बाजरीचे तयार पीठ आदी वस्तूंनाही मोठी मागणी झाली आहे. सुवासिनी सुगडामध्ये हंगामातील भाज्या, धान्य घालून पूजन करतात. भाजी मंडईतसह इतर ठिकाणी सुगड विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सुगड खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी सुगड रंगवून विक्री केले जात आहे.‘मार्केटयार्डात भोगीसाठी लागणार्‍या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती.

त्यामुळे त्याला अधिक मागणी असल्याने त्याच्या दरांत थोडीशी वाढ झाली. अन्य भाज्यांची आवक असूनही त्यांना मागणी नसल्याने त्यांच्या दरात घट झाली. मंगळवारी भोगी असल्याने रविवारी सुट्टीचा दिवस साधून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सोमवारी भोगीच्या भाज्यांना मागणी होती,’ असे विक्रेत्यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com