मातोरी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे विवाहितेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप
स्थानिक बातम्या

मातोरी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे विवाहितेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

Gokul Pawar

नाशिक । मातोरी येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे विवाहितेला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रितिका ढेरिंगे असे या विवाहितेचे नाव आहे.

दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, मूळच्या मोहाडी येथील रितिका यांचा विवाह मातोरी येथील मदन ढेरिंगे यांच्याशी झाला होता. रितिका यांचा दुसऱ्या प्रसूतीसाठीचा उपचार नाशिक शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सुरु होता. येथील डॉक्टरांनी त्यांना २० मार्च ही प्रसूतीसाठी तारीख दिली होती. परंतु दि. १३ मार्च रोजी रितिका यांना त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे सिझेरिअन करीत बाळाला जन्म दिला.

यानंतर डॉक्टरांनी रितिकाची तब्येत स्थिर असल्याचे सांगत तिला जनरल वार्डमध्ये दाखल केले व निघून गेले. परंतु काही वेळानंतर रितिका यांना पोटाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांना बोलण्यास सांगितले परंतु डॉक्टर येऊ शकत नसल्यचे येथील नर्सनी त्यांना सांगितले. पहाटे सहा वाजेच्या सुमारास रितिका हिस असह्य वेदना होत असल्याने त्यांच्या घरच्यांनी तात्काळ नर्सला विनंती करीत डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले.

यावेळी डॉक्टर आल्यानंतर त्यांनी रितिकाची परिस्थिती पाहत पतिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावयास सांगितले. यानंतर सकाळी ८ वाजेच्या सुमारास तिला दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. रितिका यांच्या नातेवाईकांनी रितिका यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. दरम्यान, कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी विवाहितेच्या नातलगांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com