कोरोना : लॉकडाऊनमुळे मानवी संचार बंद अन बिबट्याचा मुक्त संचारही…

कोरोना : लॉकडाऊनमुळे मानवी संचार बंद अन बिबट्याचा मुक्त संचारही…

नाशिकरोड । का.प्र.
गेल्या महिन्यात दारणाकाठच्या गावांत बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भीती व दहशतीचे वातावरण होते. तथापि, कोरोनाचा उद्रेक वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आणि नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले. यामुळेच की काय, शहराकडे धाव घेणाऱ्या बिबट्यांची संख्या आठवडाभरात अगदीच नगण्य झाल्याचे दिसून येते.

दारणाकाठच्या लहवीत, लोहशिंगवे, संसरी, बेलदगव्हाण, दोनवाडे, राहुरी, पळसे, शिंगवेबहुला या ग्रामीण भागासह भगूर, देवळाली कॅम्प अशा शहरी भागातील नागरिकांना गेल्या महिन्यात दररोज बिबट्याचा मुक्त संचार अनुभवास मिळाला. कोणाच्या शेतात, वावरात, घराच्या ओसरीत तर कधी थेट रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक भीतीच्या छायेत वावरत होते. कित्येकांच्या पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. लॅमरोडवरील ओझरकर यांच्या बंगल्याच्या आवारात, भगूरच्या देवी मंदिरा समोरील फर्जंदी बागेत बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्या सतत वाचनात येतात. दारणाकाठचा संपूर्ण परिसर मुबलक पाण्यामुळे सुजलाम सुफलाम आहे. याशिवाय घनदाट झाडी व जंगलाचा भाग असल्याने पाणी तसेच भक्ष्याच्या शोधात बिबटे त्या ठिकाणी कूच करतात. मात्र सर्वत्र होणारी वृक्षतोड वन्य प्राण्यांच्या अधिवासावर घातक ठरते, हे वारंवार निदर्शनास येऊनही वृक्षतोड कमी होत नाही. ही खेदाची बाब आहे.

वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात मानवाने घुसखोरी केल्याने पाणी व भक्ष्याच्या शोधत वन्य प्राणी अधूनमधून शहराकडे धाव घेतात, हे वारंवार निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेले लॉकडाऊन वन्य प्राण्यांच्या मूळ अधिवासासाठी लाभदायी ठरत असल्याचे येथील रहिवासीयांनी सांगितले. संचारबंदीच्या काळात दारणाकाठच्या पट्ट्यात बिबटे आढलण्याच्या घटना अगदीच नगण्य झाल्याने नागरिकांच्या सांगण्याला पुष्टी मिळते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com