जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार जणांवर गुन्हे दाखल 
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार जणांवर गुन्हे दाखल 

Gokul Pawar

नाशिक : लाँकडाऊन काळात नाशिक शहर तसेच जिल्ह्याभरात  संचारबंदी नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या  ११ हजार ६४२ नागरिकांवर आतापर्यंत पोलिसांकडुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २३ मार्च ते २७ मे या दोन महिन्यात ही कारवाई झाली असून, त्यात नाशिक ग्रामीण पोलिस दलाने ४ हजार ९८७ तर, शहर पोलिस दलाने सहा हजार ६५५ गुन्हे दाखल केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल होण्याचा हा वक्रम मानला जात आहे.
करोना विषाणुसारख्या छुप्ता शत्रुपासून बचावासाठी घरी रहा सुरक्षीत रहा, मास्कचा वापर करा या करोनाला रोखण्यात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या सुचनांबाबत सतत जनजागृती करण्यात येते आहे. मात्र, या सुचनांकडे दुर्लक्ष करण्याची काही नागरिकांची मानसिकता धोकादायक ठरत आहे.
  लॉकडाऊन काळात विनाकारण भंटकती करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. कलम १८८ प्रमाणे दिवसाला शहर आणि जिल्ह्यात शेकडो गुन्हे दाखल होत आहे. ग्रामीण पोलिस आणि शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा एकत्रीत आकडा ११ हजार ६४२ इतका झाला आहे. तर, तीन हजारांच्या दरम्यान वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सुचना वा इशारा देऊन सोडून देण्यात आलेल्या नागरिकांचा आकडा तर काही हजारोंच्या घरात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस दलातर्फे मालेगावमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. सुरूवातीच्या टप्प्यात कारवाईचा वेग अधिक होता. शहरात सुद्धा तीच परिस्थिती असून, आता नाशिक शहरामध्ये करोना रूग्णांची वाढ झपाट्याने होते आहे. त्यामुळे कारवाईचा वेग सुद्धा वाढला आहे.
मास्कचा वापर टाळणे सुद्धा धोकादायक आहे. मास्क न वापरता घराबाहेर पडण्यास बंदी आहे. याची जाणिव सुद्धा असते. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. शहर पोलिसांनी आतापर्यंत अशा अठराशे नागरिकांवर कारवाई केली आहे. सध्या वाढलेले रूग्ण आणि आगामी पावसाळ्यातील धोका लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.  असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Deshdoot
www.deshdoot.com