नाशिक : पुणे येथील खाजगी लॅबद्वारे चाचण्या होणार ; काही तासांत मिळणार अहवाल
स्थानिक बातम्या

नाशिक : पुणे येथील खाजगी लॅबद्वारे चाचण्या होणार ; काही तासांत मिळणार अहवाल

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा पन्नासच्यावर गेला आहे. नवीन बाधीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची संख्या वाढती असुन त्याचा स्वॅब नमुने तपासणीस विलंब होत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यास अडथळे निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने संशयितांच्या स्वॅब नमुन्याची तात्काळ चाचणी पुण्यातील क्रस्ना लॅबकडुन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल व्हॅनद्वारे संशयिताचे नमुने घेऊन ते पुण्याला देण्याचे काम ही लॅब करणार असल्याने आता महापालिका क्षेत्रातील करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला वेग येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय बनलेला असुन मालेगांव महापालिकेतील करोना बाधीतांचा आकडा दिवसागणीक वाढत चालला आहे.

तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा व नाशिक महापालिका या भागात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. वाढते रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील संशयित व इतर संशयितांचा आकडा वाढत असल्याने स्वॅब तपासणीच्या कामास विलंब होत असल्याने राज्य शासनाने मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज याठिकाणी लॅब सुरू केली आहे.

याठिकाणी नियमित चाचणीस मर्यादा येत असल्याने धुळे व पुणे येथे नमुने पाठविण्याचे काम केले जात आहे. डॉ. पवार मेडीकल कॉलेजात आता मालेगांव व नाशिक ग्रामीण भागातील नमुने तपासणीस प्राधान्य दिले जात आहे. यामुळे चाचणीस होत असलेला विलंब टाळण्यासाठी नाशिक महापालिकेकडुन पुण्यातील एका खाजगी लॅबकडुन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे येथील क्रस्ना लॅबकडुन चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर त्यास नुकतीच महापालिका स्थायी समितीकडुन मान्यता देण्यात आली आहे. खाजगी लॅबकडुन एक चाचणीस ४५०० रु. खर्च येत असतांना आता क्रस्ना लॅब नाशिक महापालिकेला प्रति चाचणी २ हजार रु. शुल्क आकारणार आहे.

याकरिता महापालिकेकडुन करोनाच्या पार्श्वभूमीवर चार कोटींची तरतुद केली आहे. या खाजगी लॅबकडुन आपल्या व्हॅनमार्फत संशयितांचे स्वॅब, तसेच करोना बाधीतांच्या संपर्कातील अति जोखमीच्या व कमी जोखमीच्या व्यक्तींचे त्यांच्या घरी जाऊन स्वॅब घेतले जाणार आहे. त्यानंतर ही व्हॅन तात्काळ पुण्याला रवाना होऊन काही तासात संशयितांचे चाचणी अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे.

अशाप्रकारे तात्काळ अहवाल प्राप्त झाल्यास बाधीतांच्या संपर्कातील लोकांना अलगीकरण कक्षात ठेवणे व त्यांच्यावर तात्काळ उपचार होणार आहे. यामुळे मृत्युचे प्रमाण कमी ठेवण्यास आणि प्रादुर्भाव रोकण्यास मोठी मदत होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com