Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब होणार कार्यान्वित

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब होणार कार्यान्वित

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी नाशिक मध्ये कोरोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी यासाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न आहेत.

त्यानुसार आय.सी.एम.आर कडून व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मधील लॅबची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच ही लॅब कार्यान्वित होणार आहे.

- Advertisement -

कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज,पुणे या लॅबची मदत घ्यावी लागत असल्याने चाचणी अहवाल येण्यामध्ये अधिक वेळ जात आहे. नाशिकमध्ये कोरोना तपासणी लॅबला परवानगी मिळावी यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळांनी मागणी केली होती. तसेच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा सदर लॅब बाबत आवश्यक पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याबाबत भुजबळांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी वेळोवेळी चर्चा देखील केली असून लॅब सुरू करण्याबाबत सातत्याने संपर्क सुरू होता. दि.१३ एप्रिल रोजी मंत्री मंडळ उपसमितीच्या बैठकीत नाशिकची लॅब प्रथम प्राधान्याने चालू करून द्यावी अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार मंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी यांना नाशिकच्या लॅब मध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने लॅबच्या परवानगीचे अधिकार पुणे आणि नागपूर केंद्राला दिले आहेत. त्यानुसार आय.सी.एन.आर च्या अधिकाऱ्यांनी मविप्र येथील मेडिकल कॉलेजच्या लॅबची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाहणी केली आहे. सदर प्रयोगशाळेसाठी अतिरिक्त आवश्यक यंत्रसामुग्री नाशिकच्या दातार लॅब येथून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उपलब्ध करून दिले आहे.

तसेच यासाठी लागणाऱ्या मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञांना नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेऊन हे तज्ञ लवकरच नाशिक येथे येणार असून लवकरच मविप्र मेडिकल कॉलेज येथील कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमधील रुग्णांचे अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या