दोन दिवसांपासून करोना टेस्टिंग लॅब बंद
स्थानिक बातम्या

दोन दिवसांपासून करोना टेस्टिंग लॅब बंद

Gokul Pawar

नाशिक : मविप्रच्या डाॅ. वसंतराव पवार मेडिकल काॅलेजमधील करोना टेस्टिंग लॅबचे कामकाज गेल्या शुक्रवार पासून बंद आहे. जिल्हा रुग्णालयाकडून तपासणीसाठी आवश्यक असलेली सामग्रीच उपलब्ध होत नसल्याने स्वॅब तपासणीचे काम ठप्प झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आश्वासन देऊनही ‘जैसे थे’ परिस्थिती पहायला मिळत आहे.

नाशिकला कोरोना टेस्टिंग लॅब झाल्याने करोनाचे निदान त्वरित होऊन कोरोना संसर्गाला अटकाव घालता येईल ही अपेक्षा होती.स्वॅब तपासण्यासाठी लॅबमध्ये काही साधनसामग्रीची आवश्यकता असते. या साधनसामग्रीचा तुटवडा जाणवू लागल्याने ती मागविण्यात आली होती.

शुक्रवारी सायंकाळी ही सामग्री प्राप्त होणार होती. परंतु, विमान रद्द झाल्याने ही सामग्री प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून स्वॅब तपासणीचे काम थांबले आहे. मंगळवारी ही सामग्री मिळणार असून, तोपर्यंत या लॅबचे काम बंद राहणार आहे.

त्यानंतर ही लॅब कार्यान्वित होईल, असे मांढरे यांनी सांगितले. दरम्यान, धुळे येथील प्रयोगशाळेमध्ये नाशिकसाठी तीनशे स्वॅब तपासणीचा कोटा राखीव असल्याने जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी धुळ्याला पाठविले जात आहेत.

सद्यस्थितीत प्राप्त होणाऱ्या स्वॅबची संख्याही कमी असल्याने अहवाल मिळविण्यात अडचण येत नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. यापुढील काळात साधनसामग्रीचा तुटवडा भासू नये, याकरिता पुढील महिनाभराची सामग्री आतापासूनच उपलब्ध करून घ्या, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना दिल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

स्वॅब तपासणीसाठी २४ प्रकारचे मटेरियल लागते. आम्हाला जेव्हा पूर्ण साहित्य दिले तेव्हा २४४ स्वॅब एका दिवसात आम्ही तपासले. मात्र, जिल्हा रुग्णालयाकडून अपुरे मटेरियल दिले जाते. साहित्य पुरवावे यासाठी जिल्हा रुग्णालयाला आतापर्यंत अनेकदा पत्र लिहून झाले आहे. मात्र तरी देखील साहित्य पुरवले जात नाही. त्यामुळे सध्या कामकाज ठप्प आहे.
– डॉ.मृणाल पाटिल, डिन डॉ.वसंत पवार मेडिकल कॉलेज

Deshdoot
www.deshdoot.com