Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : रायांबे येथील युवकास करोनाची लागण; १८ जण क्वारंटाईन

इगतपुरी : रायांबे येथील युवकास करोनाची लागण; १८ जण क्वारंटाईन

घोटी : इगतपुरी शहरापाठोपाठ तालुक्यातही करोनाचे लोन पसरू लागले आहे. ग्रामीण भागातील रायांबे येथील २९ वर्षीय युवकालाही करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई येथे नोकरीस असल्याने रोजच्या प्रवासातून हा संसर्ग झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घेत रायांबे गाव सील करून खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील व हायरिस्क संपर्कातील ११ लोकांना आयसोलेशन करण्यात आले असून १८ लोकांना कोरोंटाइन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

- Advertisement -

ग्रीन झोन व करोनामुक्त म्हणून इगतपुरी तालुक्यात ओळख असताना आता या तालुक्यातही करोना विषाणूचा शिरकाव झाल्याने गेल्या आठ दिवसापासून या तालुक्यात जवळपास चार रुग्ण करोनाबाधित झाले आहेत. घोटी व इगतपुरी शहरात दोन्ही व बेलगाव कु-हे येथील रुग्णाचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या तिन्ही रुग्णांच्या जवळच्या नातलगांचे व संपर्कातील नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने तालुक्यासाठी ही दिलासादायक ठरली.

घोटी इगतपुरीत प्रतिबंधात्मक क्षेत्र अद्याप उघडत नाही तोच आता रायांबे गावातही एका २९ वर्षीय युवकाला करोनाची लागण झाली. हा युवक मुंबई येथे अंधेरी एमआयडीसी येथे कंपनीत नोकरीस असल्याने तो नेहमी नोकरीच्या ठिकाणी ये जा असते. त्यातच गेल्या काही दिवसापूर्वी त्याला सर्दी व तापाची लक्षणे जाणवत असल्याने त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही माहिती समजताच तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी किरण जाधव , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एम बी देशमुख, घोटीचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे आदींच्या पथकाने रायांबे परिसराची पाहणी करून प्रतीबंधात्मक व खबरदारीच्या उपाययोजना स्पष्ट केल्या.

इगतपुरी येथे गेल्या चार दिवसापूर्वी खालची पेठ परिसरात ७१ वर्षीय वृद्ध व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट होते. वैदयकीय चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. दिलासादायक बाब म्हणजे इगतपुरीतील या रुग्णासह त्याच्या सर्व नातलगांचे रिपोर्ट निगेटिव्ह निघाल्याने प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या