होळीचा रंग व पिचकार्‍यांनाही कोरोनाचा फटका; महागाई वाढली
स्थानिक बातम्या

होळीचा रंग व पिचकार्‍यांनाही कोरोनाचा फटका; महागाई वाढली

Gokul Pawar

नाशिक । होळी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु करोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे चिनी वस्तूंच्या आयातीवर भारतात निर्बंध घालण्यात आल्याने होळीत दरवर्षी सहज मिळणार्‍या चिनी वस्तू बाजारातून गायब आहेत. याचा फायदा स्थानिक व्यापार्‍यांना होत असून स्वदेशी वस्तूंना मागणी वाढली आहे.

रंगपंचमी येताच दरवर्षी बाजारात चिनी बनावटीच्या पिचकार्‍या, रंग व अनेक प्रकारच्या वस्तू भारताच्या बाजारात येतात. मात्र यंदा चीनमध्ये करोनाचा प्रभाव असल्याने भारतात चिनी मालाच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आल्याने बाजारात या वस्तू बेपत्ता आहेत. याचा फायदा स्थानिक उत्पादक व व्यापार्‍यांना होत आहेत. शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा येथील बाजारात पारंपरिक व नैसर्गिक रंग, फॅन्सी आणि कार्टुन पिचकार्‍यांनी दुकाने सजली आहेत. यात विविध प्रकारचे मुखवटे, टोप्या, रबर, फोल्डिंग पुंगी व प्लास्टिकचे मास्कही आहेत. होळीचा रंग व पिचकार्‍यांनाही महागाईचा फटका बसला आहे.

दरवर्षी पिचकार्‍यांच्या रचनांमध्ये काही ना काही बदल होत असतो. यावर्षी सुद्धा पबजीची अधिक क्रेझ दिसून येत आहे. पबजी डिझाईनच्या वस्तूंची मागणी जास्त आहे. रंग व गुलाल दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 ते 10 टक्के महाग झाले आहेत. यावर्षी गन, टँक, सिलिंडर आणि पाईप्ससह कार्टुन व सेलिब्रिटींचे चित्र असणार्‍या पिचकार्‍या बाजारात दाखल झाल्या आहेत. पिचकार्‍यांची किंमत 20 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंत आहे. यात छोटा भीम, टँक, मोटू-पतलू, अँग्रीबर्ड, डोरेमॉन, वॉटर गन, शूटर पंप, एअर व मशीन गनसारख्या पिचकार्‍या मुलांना आकर्षित करीत आहेत.

यासोबतच नवनवीन रबर आणि प्लास्टिकच्या हॉरर मुखवट़्यांसह नवीन स्टाईलचे विगसुद्धा बाजारात आले आहेत. आता पंख असणार्‍या टोप्यांची जागा कॉक कॅपने घेतली आहे. त्या काळ्या, पांढर्‍या, सोनेरी अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कलरिंग हेअर विग आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com