Friday, April 26, 2024
Homeनाशिकऐन सुगी अन लग्नसराईत कोरोनाचा खोळंबा; शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले

ऐन सुगी अन लग्नसराईत कोरोनाचा खोळंबा; शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले

नाशिक : कोरोनाच्या साथीमुळे ऐन सुगी व लग्नसराईचा जवळपास एक महिना वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. लग्नाच्या तारखा काढलेल्या वधुपित्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. हे जागतिक संकट दूर होऊन व्यवहार सुरळीत सुरू व्हावेत, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

सर्वच उद्योग, व्यवसाय, छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार यांच्यावर विपरित परिणाम झाला आहे. मात्र, यात शेतकरी हा सर्वात जास्त भरडला जात आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीतील काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगी व लग्नसराईचा असतो. या काळात शेतीमाल तयार करून विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन केले जाते. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा कापूस, मका अजूनही घरातच आहे. कापूस, मकाची खरेदी बंद झाल्याने तो कुठे व कसा विकायचा याचे नियोजन झालेले नाही. विक्रीअभावी घरात पडून असलेल्या कापसात पिसा झाल्यामुळे शेतकरी हैराण आहेत. गव्हाची काढणी व सोंगणी सुरू असून निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचा गहू शेतातच उभा आहे. बाहेरून आलेले हार्वेस्टर चालक केव्हाच परतले आहेत.

यंदा हातानेच सोंगणी करून मशिनने गहू मळणीचे काम थोड्याफार प्रमाणात केले जात आहे. काही वर्षापासून शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहेत. यंदा खरीप हंगाम परतीच्या पावसाने वाया गेल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर होती. रब्बीचे पीक तुलनेने चांगले आले असून कापूस घरात येऊन पडला होता. मक्याच्या गंजी शेतकऱ्यानी लावून ठेवल्या होत्या. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मका, कापूस विकला नाही. याच दरम्यान करोनाची साथ पसरली व संचारबंदी लागू झाली. परिणामी, शेतीमाल विक्री ठप्प झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना चणचण भासत असून पैशाअभावी अनेक व्यवहार खोळंबले आहेत.

पीक विकणे कठीण

अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत उन्हाळ्यात ठिबक सिंचनाद्वारे टरबुज, काकडी, टॉमॅटो आदी पिके घेतली आहेत. त्यासाठी मोठा खर्च केला आहे. ही पिके निघण्याच्या काळातच करोनाची साथ पसरली आहे. हे पीक काही शेतात तोडणीअभावी खराब होत आहे. भाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतातच ढीग लावून ठेवला आहे. काही जण कवडीमोल भावाने शेतमाल विकत आहेत.

लग्ने खोळंबली

साधारणत: लाेक व शेतकरी डिसेंबरपासून मुलींसाठी स्थळ शोधून लग्नाची तारीख ठरवून ठेवतात. एप्रिल-मे मधील तारखांना प्राधान्य असते. अनेकांनी तारखा काढून मंडप, स्वयंपाकी, वाहने, बँड, मंगल कार्यालये आदींसाठी अनामत दिली आहे. पण या वातावरणामुळे वधुपित्याचा जीव टांगणीला लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या