सिन्नर : आठवडाभरात डीएड महाविद्यालयात सुरु होणार कोरोना केअर सेंटर : संचालक हेमंत वाजे
स्थानिक बातम्या

सिन्नर : आठवडाभरात डीएड महाविद्यालयात सुरु होणार कोरोना केअर सेंटर : संचालक हेमंत वाजे

Gokul Pawar

सिन्नर : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर महाविद्यालयाच्या आवारातील डीएड महाविद्यालयाच्या इमारतीत करोना केअर सेंटरची उभारणी केली जात आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत संस्थेची इमारत उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती संस्थेचे संचालक हेमंत वाजे यांनी दिली.

संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यासाठी सहकार्य लाभले. कोरोना केअर सेंटरसाठी इमारत उपलब्ध करुन देण्याची मागणी तहसीलदार राहुल कोताडे यांनी संचालक वाजे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी संस्था पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सकारात्मक प्रतिसाद दिला. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही सामाजिक दृष्टीकोनातून लगेचच परवानगी दिली. त्यानंतर येथे ४०० खाटांचे केअर सेंटर उभारण्यात येत आहे.

केअर सेंटरचा परिसर बंदीस्त स्वरुपाचा वातावरणही शांततेचे आहे. महाविद्यालयाच्या आवारात एका बाजूला ही इमारत असल्याने केअर सेंटरपासून इतर विभागही सुरक्षित राहणार आहेत. नाशिक-पुणे महामार्गावर इमारत असल्याने रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी, पोलिस यांच्यासाठी जागा सोयीची आहे. त्यामुळे येथील केअर सेंटर सर्व दृष्टीकोनातून सुरक्षित असल्याचे संचालक वाजे यांनी सांगितले.

तालुक्यासाठी गरजेची बाब
नाशिकच्या रुग्णालयावर कामाचा वाढता ताण पाहता भविष्यातील गरज म्हणून तालुकास्तरावर केअर सेंटर होणे गरेजेचे होते. त्याच्या निर्मितीसाठी इमारतीची गरज होती.

तालुकावासियांसाठी महत्वाची म्हणून इमारत तातडीने उपलब्ध होण्यासाठी संस्थेच्या मदतीने तातडीने ती उपलब्ध करुन दिली. आठवडाभरात ४०० खाटांचे हे सेंटर सज्ज होणार आहे. संस्थेच्याच नाशिक येथील डाॅ. वसंतराव पवार रुग्णालयात टेस्टींग लॅबही सुरु झाल्याचे वाजे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com