‘आला करोना राव…’स्वरचित गीतातून ग्रामपंचायत सेवकाकडून जनजागृती
स्थानिक बातम्या

‘आला करोना राव…’स्वरचित गीतातून ग्रामपंचायत सेवकाकडून जनजागृती

Gokul Pawar

सिन्नर : सध्या सर्वत्र करोना या आजाराने धुमाकूळ घातला आहे. उठता, बसता सगळीकडे या आजाराचा वेगाने वाढणारा संसर्ग आणि लॉकडाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन यावरच चर्चा सुरु असते. करोना पासून बचाव करण्यासाठी शासन स्तरावरून सतत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पण लोक ऐकतील तर शप्पथ…, मात्र, अशा वातावरणात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील वावी ग्रामपंचायतचा सेवक सरसावला आहे. आला करोना राव.. या स्वरचित गीतातून त्याने लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियात देखील या गाण्याची चर्चा सुरू आहे.

घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या तात्या वर्पे या तरुणाकडून लोकजागृतीसाठीचा एक छोटा प्रयत्न चांगलाच प्रभावी ठरेल असे दिसते आहे. वाचनाची आवड असणाऱ्या तात्याने आपल्या अकलनातून करोनावर चार कडव्यांचे गाणे रचले आहे. गेल्या आठवड्यात त्याने फेसबुकच्या माध्यमातून हे गाणे प्रसारित केली. हे स्वरचित काव्य त्याने स्वतःच पहाडी आवाजात लयबद्ध केले आहे. कोणतेच पार्श्वसंगीत नसताना देखील केवळ आवाजातील कणखरपणामुळे त्याने गायलेले गाणे ऐकणाऱ्यास करोना या आजाराच्या वास्तवतेची जाणीव करून देते.

करोनालढाईमध्ये योगदान देणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य सेवक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा देखील उल्लेख केला आहे. या करोना योध्यांचा मान सन्मान करण्यासोबतच प्रत्येकाने हा आजार बळावू नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सहज सुचले म्हणून ‘आला करोना राव …’ अशी सुरुवात असणाऱ्या या गाण्याचा शेवट ‘…गेला करोना राव’ असा सकारात्मक करण्यात आला आहे.

प्रख्यात लोकगीत गायक आनंद शिंदे यांची मुलखात मला हे गाणे रचण्यासाठी प्रेरणादायी ठरली. आपण आपली आवड जपण्यासाठी गाणे बनवतो, लोक त्यांच्या कुवतीप्रमाणे काय बोध घ्यायचा तो घेतील असा संदेश त्यांनी मुलाखतीत दिला होता. सध्या करोना आजाराने सर्वांच्या मनात भीती तयार केली आहे. मात्र काळजी घेतली तर ही भीती बाळगण्याचे कारण नाही हेच मी गाण्यातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गाण्यातून चार लोक सकारात्मक विचार करणार असतील तर तेच माझ्यासाठी समाधान राहील.

– तात्या वर्पे, ग्रामपंचायत सेवक वावी

Deshdoot
www.deshdoot.com