कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
स्थानिक बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना या जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात असुन कोरोना संसर्गीत आढळल्यास त्यावर करावयाचे उपचार व उपाययोजना संदर्भातील एक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहरातील संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेतला. तपोवन येथील इमारत, बिटको हॉस्पिटल लगतची इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथील पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे व संबधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना करतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संभाव्य रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था त्याचप्रमाणे निरीक्षणाखालील संभावीत रुग्ण कोरोना संसर्गीत आढळल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, उपचार करण्याची व्यवस्था या सर्व बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यासर्व माहितीच्या आधारे एक कृती आराखडा तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितांना दिल्या.

तपोवन येथील इमारतीत विलगीकरणासाठी 48 बेडची व्यवस्था असुन नाशिकमध्ये शंभरपेक्षा अधिक संभावित नागरिकांना विलगीकृत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच साठहून अधिक संसर्गीत रुग्णांना उपचार देण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यात गरजेप्रमाणे खाजगी रुग्णालयांच्या मदतीने तात्काळ वाढ करता येणे देखिल शक्य आहे, असेही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

रुग्णांशी साधला संवाद

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये निरीक्षणाखाली असणाऱ्या तीन रुग्णांशी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे समवेत सुसंवाद साधला. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्याशी सुसंवादासाठी आल्याने तसेच जिल्हाधिकारी व प्रशासनाने त्या ठिकाणी असलेल्या सेवा व सुश्रृषा व व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.

Deshdoot
www.deshdoot.com