Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : पाथरे, दापूर येथे मालेगाव व मुंबईवरून आलेल्यांविरोधात संचारबंदीचे गुन्हे

सिन्नर : पाथरे, दापूर येथे मालेगाव व मुंबईवरून आलेल्यांविरोधात संचारबंदीचे गुन्हे

सिन्नर : शासनाच्या संचारबंदी आदेशाला झुगारून ग्रामस्थांच्या आरोग्याला हानी पोहोचेल अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या आठ जणांविरोधात पोलिसांनी संचारबंदी भंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.

तालुक्यातील पाथरे येथील तिघेजण मालेगाव तर दापूरचे पाच जण मुंबई येथून आल्यानंतर ग्रामस्थ व प्रशासनाला कोणतीही माहिती न देता गावात फिरत असल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

पाथरे खुर्दचे ग्रामविकास विकास अधिकारी नितीन मेहेरखांब यांच्या फिर्यादीवरून निजाम जमाल शहा (५२) हाजो निजाम शहा (४१), कलिग निजाम शहा (३२) सर्व राहणार वारेगाव यांच्याविरोधात आज (दि.११) रोजी वावी पोलीस ठाण्यात संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सर्वजण कोरोनाची साथ असताना तोंडाला कुठल्याही प्रकारचा मास्क अगर रुमाल न बांधता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गेल्या आठवड्यात वारेगाव येथून मालेगाव येथे मोटरसायकल क्रमांक एमएच १७ एक्यु ६९४१ व एमएच १५ जीएन ७१४१ या वाहनावरून गेले होते.

या प्रवासाची माहिती त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनापासून लपवून ठेवली आणि परत आल्यावर गावात निष्काळजीपणाने फिरत ग्रामस्थांच्या जिवाला अपाय होईल असे वर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हवालदार दशरथ मोरे तपास करीत आहेत.

दुसऱ्या प्रकारात दापुरचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण बुरसे यांनी तक्रार दाखल केली आहे. भगवान कारभारी आव्हाड, सिंधू भगवान आव्हाड, योगिता भगवान आव्हाड, सिद्धेश भगवान आव्हाड, गायत्री नरेंद्र फड सर्व रा. दापुर हे मुंबई येथून शुक्रवारी दि. १० पहाटेच्या सुमारास एमएच ०३ डीबी ३८४१ या छोटा हत्ती वाहनातून गावात आले होते.

जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी आदेश लागू असताना व तोंडाला रुमाल अथवा मास्क न बांधता गावात निष्काळजीपणे वाहनातून फिरले व आपल्या प्रवासाबद्दल प्रशासनास कोणतीही माहिती दिली नाही म्हणून या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण अढागळे या प्रकरणी तपास करत आहेत.

वरील गुन्हे दाखल झालेल्या सर्वांना तहसीलदार राहुल कोताडे यांच्या सूचनेनुसार आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या