हरसुल : प्राचार्य डॉ.देशमुख यांची खेडोपाडी जाऊन कोरोनाबाबत जनजागृती

हरसुल : प्राचार्य डॉ.देशमुख यांची खेडोपाडी जाऊन कोरोनाबाबत जनजागृती

हरसूल : सध्या कोरोना विषाणू संसर्गाने जगात थैमान घातले असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर,पेठ तालुक्यातील हरसूल पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत, खेडेपाडे, वस्त्यांवर सामाजिक बांधिलकीने स्वखर्चाने कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करणाऱ्या प्राचार्य डॉ.मोतीराम देशमुख यांचे परिसरात कौतुक होत आहे.

हरसूल पोलीस स्टेशनची हद्द ही चौरस स्वरूपाची आहे. गुजरात राज्याच्या सीमा रेषांना जाणाऱ्या ग्रामपंचायत, वस्त्या आहेत. ५८ ग्रामपंचायत आणि इतर खेडेपाडे, वस्त्या या हरसूल पोलीस स्टेशन अंतर्गत येतात. वीज, रस्ते, पाणी मूलभूत समस्या तर आहेच परंतु कोरोना सारख्या विषाणू संसर्गाने आणखी भर पडली आहे. या भागात हरसूल पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत माध्यमातून कोरोना विषाणू संसर्गाची जनजागृती करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात या कोरोना विषाणूच्या माहामारीची उदासीनता, बेपर्वाई, भीती आणि चिंता जाणवत आहे.

ही बाब लक्षात घेऊन हरसूलचे रहिवासी असलेल्या प्राचार्य डॉ.एम. आर.देशमुख यांनी कोरोना विषाणूच्या जनजागृतीबाबत सामजिक बांधीलकीतुन पुढाकार घेतला आहे.त्यांनी हरसूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत, वस्त्या आदी ठिकाणी कोरोना बाबत जनजागृती करत आहे.त्यात कोरोना विषाणू संसर्गाचे होणारे परिणाम, लॉक डाऊनचे महत्त्व, महामारीचे गांभीर्य, प्रतिबंधात्मक उपाय जनजागृती प्रसंगी पटवून सांगत आहेत.

यामुळे या भागात कोरोना विषाणूच्या जनजागृतीत आणखीच भर पडली आहे. स्वतः ची काळजी घेत इतरांच्या सेवेतून मिळणारे समाधान हे वेगळेच असल्याचे मत डॉ.देशमुख यांनी व्यक्त केले. या भागातील अज्ञान,उदासीनता आणि तरुण वर्गाची बेपर्वाई कोरोना सारख्या संसर्गाला या जनजागृतीच्या माध्यमातून या ‘अवलिया’ची मदत होत असल्याने त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

हरसूल पोलीस स्टेशन अंतर्गत ५८ गावांचा समावेश आहे. या पोलीस स्टेशनची हद्द आरपार स्वरूपाची असून त्यात कर्मचारी वर्गही पुरेसा नाही.तरीही महाराष्ट्र ते गुजरात राज्य सीमा रेषा पर्यंत हरसूल पोलिसांचा चौफेर डोळा आहे..त्यात कोरोना विषाणू पाश्वभूमीवर हरसूल, ठाणापाडा या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच जनजागृतीच्या माध्यमातून प्राचार्य डॉ.देशमुख दररोज ५० किमी अंतराचा परिसर समाज प्रबोधन, मार्गदर्शन करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com