महापालिकेच्या सीएनजी बस शहरात दाखल; एप्रिलपासून बससेवा सुरु

महापालिकेच्या सीएनजी बस शहरात दाखल; एप्रिलपासून बससेवा सुरु

नाशिक । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिला गेलेल्या महापालिका शहर बससेवा येत्या 1 एप्रिल 2020 पासून सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीकडून सुमारे दीडशे बसेस शहरात दाखल झाल्या असून नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात यापैकी 20 बसेस या नोंदणी प्रक्रियेत आहे.

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, सक्षम वाहतूक पर्याय व प्रदूषणमुक्त शहर या बाबी लक्षात घेऊन महापालिकेने शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रति कि. मी. अंतरानुसार ऑपरेटर ठेकेदार कंपनीला पैसे द्यावे लागणार असून यात डिझेल, इलेक्ट्रीक व सीएनजी बसेसकरिता वेगवेगळे दर आहे. यात 50 इलेक्ट्रीक बसेस या केंद्र शासनाकडून मिळणार आहे. शहर बससेवेसाठी इलेक्ट्रीक 150, सीएनजी 200 आणि डिझेल 50 अशा 400 बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र यातून होणारा तोटा लक्षात घेत महापालिकेने सीएनजी 200, इलेक्ट्रीक 50 व डिझेल 50 अशा 300 बसेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात परिवहन विभागाने काही बाबीसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तसेच महापालिकेने 1 एप्रिल 2020 पासून शहर बसेस रस्त्यावर आणण्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर एका ऑपरेटर कंपनीकडून शहरात महापालिकेच्या सेवेत येणार्‍या सुमारे दीडशे बसेस या शहरात आणल्या आहे.

यातील वीस शहर बसेस नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणीसाठी दाखल झाल्या होत्या. या बसेसची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com