स्थानिक बातम्या

सामाजिक भान : जिल्ह्यात ‘तंबाखुमुक्त शाळा’ अभियान फलदायी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | गोकुळ पवार :  धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले आहे. अभियानातून अनेक शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

सध्या सगळीकडे शाळेच्या परिसरात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे, असे फलक लावलेले दिसून येतात. तर तंबाखूमुक्त शाळा अभिनयांतर्गत सर्व शाळांना अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. शाळेत फलक लावून तंबाखूमुक्त शाळा यावर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, पथनाट्य, निबंध स्पर्धाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यातूनच जवळपास ८० टक्केच्या आसपास जिल्ह्यातील शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. याआधी शाळेजवळच एखादी टपरी असल्याने शाळेतील लहान मुलांवर याचा परिणाम दिसून येत होता. तसेच काहीवेळा पालक तसेच समाजातील इतर घटकांकडून लहान वयात व्यसन लागण्याची अधिक शक्यता असते. परंतु या अभियानाद्वारे अनेक शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत.

यासाठी शाळेने तंबाखूचे दुष्परिणाम, कॅन्सरची लक्षणे या विषयांवर सत्र, तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे गरजचे आहे. अनेक शाळांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखान्यांची मदत घेत आरोग्य तपासणी शिबीर राबविले आहे.

शाळेच्या, गावाच्या दर्शनीय भागात जनजागृतीपर पोस्टर, विविध पोस्टरसह गावातून रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक सभेद्वारे गावकऱ्यांना तंबाखुच्या परिणामांबाबत माहिती दिली. शाळेजवळील दुकानांना अशा पदार्थांची बंदी आहे. अभियानाच्या सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शासनाकडून पाठविलेल्या लिंकमध्ये माहिती भरण्यात आली. यामुळे शाळेजवळचा परिसर तंबाखुमुक्त झाला आहे.
-सुधीर पाटील, जिप शाळा, मुळेगाव

तंबाखुमुक्त शाळा व परिसर झाल्याने स्थानिक पालकांमध्येही जनजागृती झाली आहे. शाळेच्या परिसरातील गुटखा , तंबाकू विकणारे विक्रेते गावातून कमी झाले आहेत. तसेच तंबाखूमुक्त शाळा तसेच गाव कर्णयसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा नाटक, म्हणीचा समावेश करण्यात आला. पालकाच्या सहभागातून डॉक्टरांच्या माध्यमातून वार्षिक तपासणी करण्यात येते. गावात पथनाट्य, पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.
-अर्जुन राठोड, जिप शाळा खंबाळे

विद्यार्थ्यांच्या वतीने रॅली पोस्टर यातून पालकांमध्ये जनजागृती करून तंबाखूमुक्त शाळा केली आहे शाळेच्या 100 यार्ड परिसरात मादक पदार्थांच्या विक्री वर बंदी घालण्यात आल्याने गावही तंबाखूमुक्त गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
-विजय तुरकूने, जिप शाळा, हिरडी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com