नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात प्रथमच ‘चित्रबलाक’ पक्षांनी दिला गाेंडस पिल्लांना जन्म

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात प्रथमच ‘चित्रबलाक’ पक्षांनी दिला गाेंडस पिल्लांना जन्म

नाशिक : निफाडजवळील नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात प्रथमच चित्रबलाक पक्षांनी गाेंडस पिल्लांना जन्म दिला आहे.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याचा समावेश हा नुकताच रामसारच्या यादित करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण चांगले असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरण पाण्याने भरलेले आहे. त्यामुळे चित्रबलाक (Painted Stork) या जातीच्या पक्षांना यंदा घरटे बनवण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात या पक्ष्याचा प्रजनन कालावधी नोहेंबर ते मार्च असा असतो. मागील दोन वर्षांपासून या पक्ष्यांनी फेब्रुवारी मार्च महिन्यात घरटे बनविण्याचा प्रयत्न केला होता, तथापि घरटे बनविल्यानंतर पाणी कमी झालेने त्यांनी अंडी घातली नव्हती.

यावेळी मात्र या पक्ष्यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात विलायती बाभळी च्या झाडांवर काड्या वापरून घरटे बनवायला सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळात पाणी कमी न झाल्याने ३ जोडप्यांनी प्रत्येकी २ अश्या ६ पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे वन विभाग तसेच पक्षी प्रेमींकडुन आनंद व्यक्त केला जात आहे.

हे पक्षी साधारणपणे ३ ते ४ अंडी घालतात व अंडी उबवणीचा कालावधी ३० दिवसांचा असतो. जन्मलेल्या पिलांना पंख नसतात व डोळे उघडलेले नसतात. त्यामुळे नर व मादीला पुढे २ महिने पिलांची काळजी घ्यावी लागते. या काळात वेगवेगळ्या भक्षकांचा धोका असल्याने नर व मादी पाळीने या पिलांना खाद्य आणतात व त्यांची राखण करतात.

तथापि आता धरणातील पाणी कमी होत असून वरील धरणांतून पाणी येईपर्यंत या पक्षांवर काय परिणाम होतो याबाबत वनविभाग लक्ष ठेवून आहे. काळजी म्हणून या घरट्याजवळचा भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

चित्रबलाक हा रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय व अन्य पाण्यातील जीव खातो.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com