त्र्यंबकेश्वर : दोन घोट पाण्यासाठी चिमुरड्यांचीही दोन किमी पायपीट
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : दोन घोट पाण्यासाठी चिमुरड्यांचीही दोन किमी पायपीट

Gokul Pawar

वेळुंजे : एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे पाण्याची भीषण समस्या तालुक्यातील नागरिकांना भेडसावत आहे. येथील हेदआंबा या पाड्यावरील ग्रामस्थांना दोन किमी चालून नांदगाव कोहली शिवारातून पाणी आणावे लागत आहे.

दरम्यान तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पाऊस कोसळूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.यात महिलांसह पुरुषांचा समावेश असून आता लहान मुलांनाही ही कसरत करावी लागत असल्याची भीषण दाहकता समोर येत आहे. अनेक गावांना पाणी टंचाई असून कुठे दूषित पाणी, तर कुठे रात्री बे रात्री पाण्यासाठी वणवण, यामुळे कधी एकदाचे ढग बरसतील अशी आस लावून ग्रामस्थ वाट पाहत बसले आहेत.

वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हेदआंबा या पाड्यावर आजमितीस पाणीटंचाई भीषण आहे. या वाडीवरील ग्रामस्थांना दरीत उतरून नांदगाव कोहली शिवारातील झऱ्यातून पाणी आणावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी टँकरची मागणी सरपंच ग्रामसेवक यांनी वाडीची लोकसंख्या कमी असल्याने धुडकावून लावली. यामुळे येथील हताश ग्रामस्थांनी बायका मुलांना सोबत घेत पुन्हा पाण्यासाठी वाट्टेल ते म्हणत दोन किमीची पायपीट सुरू केली आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायत वेळुंजे या ठिकाणी (दि.१९) रोजी पाण्यासबंधी लेखी अर्ज दिला असून अद्याप पर्यंत त्यांचे कुठलेही उत्तर आले नसून सरपंच व ग्रामसेवक यांनी कमी लोकसंख्या असल्याने तुम्हास टँकर देता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
– जयवंत हागोठे, ग्रामस्थ

Deshdoot
www.deshdoot.com