वसंत व्याख्यानमाला रद्द; कार्यक्रमाचा निधी करोना लढाईसाठी

वसंत व्याख्यानमाला रद्द; कार्यक्रमाचा निधी करोना लढाईसाठी

नाशिक : करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे माहे मे महिन्यात गोदाघाटावर आयोजित करण्यात येणारे वसंत व्याख्यानमालेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. व्याख्यानमालेच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष विजय हाके, विलास ठाकूर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह उपस्थित होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेने सन १९०५ साली नाशिकच्या गोदा घाटावर मे महिन्यात व्याख्यानमालेचे आयोजन सर्वप्रथम करण्यात आले होते. सन १९२२ पासून माहे मे २०१९ पर्यंत सलग ९८ वर्ष मालेचा हा उपक्रम अखंडपणे सुरु आहे. यंदा माहे मे २०२० मध्ये ९९ व्या वर्षाच्या ज्ञानसत्राच्या आयोजनाच्यादृष्टीने पूर्वतयारी सुरु होती.

दरम्यान संपूर्ण जगभर करोनाने हाहाःकार माजविला आहे. भारतात दि.३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याचा कालावधी देखील वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनांवर देखील शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे मे महिन्यातील व्याख्यानमालेचे यंदाचे कार्यक्रम रद्द करण्यात यावे अशी सूचना मालेच्या चिटणीस प्रा. सौ संगिता बाफणा यांनी मांडली. खजिनदार अरुण शेंदुर्णीकर यांनी सूचनेस अनुमोदन दिले.

सर्वानुमते यंदा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत पंतप्रधान निधी व मुख्यमंत्री निधीकरीता प्रत्येकी रु.११ हजार तसेच कलावंतांच्या मदतीकरीता रु.३ हजार रूपयांचा धनादेश देण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत कार्याेपाध्यक्ष सुनिल खुने, सहचिटणीस सौ. उपा तांबे, शंकरराव बर्वे, सदस्य शरद वाघ, सुनिल गायकवाड, अॅड. चैतन्य शाह, हेमंत देवरे, अॅड. दत्तप्रसाद निकम, अंतर्गत हिशेब तपासनीस अविनाश वाळुंजे उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com