Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर बसस्थानकावरून नगर, पुणे, मुंबईच्या बसेस रद्द

सिन्नर बसस्थानकावरून नगर, पुणे, मुंबईच्या बसेस रद्द

सिन्नर । करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून रोडावल्याने सिन्नर आगारातून मध्यम व लांब पल्ल्याच्या बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी व संख्येनुसारच फेर्‍यांचे नियोजन करण्यात येत असल्याने बसस्थानक परिसरात दिवसभर शुकशुकाट दिसला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जनतेला करण्यात आले आहे. सोमवारपासून शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्याने व शासकीय कार्यालयांमध्ये देखील अघोषित संचारबंदी लागू करण्यात आल्याने एसटीच्या प्रवाशांची संख्या घटली आहे. ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या प्रवाशांसह सिन्नरहून नाशिक, शिर्डी, संगमनेरकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमी झाल्याने एसटी प्रशासनाकडून या मार्गांवरील बस गाड्यांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

नाशिक ते सिन्नर दरम्यान असलेली एसटीची शटल सेवा देखील विस्कळीत झाली आहे. दर पंधरा मिनिटांनी सोडण्यात येणारी बस आता प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन तब्बल पाऊन ते एक तासाच्या अंतराने सोडण्यात येत आहे. याशिवाय लांब व मध्यम पल्ल्याची बससेवादेखील सिन्नर आगारातून रद्द करण्यात आली आहे. शिर्डी, शनि शिंगणापूर, नाशिक, त्रंबकेश्वरसह लगतच्या जिल्ह्यातील सर्वच देवस्थानांच्या ठिकाणी जाण्यास प्रशासनाने मज्जाव केला असल्याने या ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांची गर्दी देखील आटोक्यात आली आहे.

परिणामी शिर्डीकडे जाणार्‍या मुंबई विभागातील बहुतांश बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. अ. नगर व पुणे विभागाने आज (दि. 20) मध्यरात्रीपासून मध्यम व लांब पल्ल्यांच्या बसफेर्‍या स्थगित केल्या आहेत. त्यामुळे सिन्नर बस स्थानकात दिवसभर होणारी बसेसची वर्दळ घटली. सिन्नरच्या ग्रामीण भागात जाणार्‍या बस देखील प्रवाशांच्या संख्येनुसारच सोडण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गर्दी वगळता नाशिक, अ. नगर, पुणे, शिर्डी साठीच्या फलाटांवर तुरळक प्रवासी असल्याचे चित्र होते. सिन्नर आगाराकडून ग्रामीण भागात मुक्कामी सोडण्यात येणार्‍या बसदेखील घटवण्यात येत आहेत.

खासगी वाहनांवर नियंत्रण कोणाचे?
सिन्नरच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी अनेक मार्गांवर खाजगी प्रवासी वाहने धावतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाकडून खबरदारी घेण्यात येत असली तरी खाजगी वाहतूक करणार्‍या अनेक वाहनांमधून दाटीवाटीने प्रवासी कोंबले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. परिवहन आणि पोलिस विभागाने याकडे लक्ष देईल का? शहराकडे होणारी गर्दी टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून खाजगी वाहतूक करणारी प्रवासी वाहने पुढील काळात बंद होतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या