सिन्नर : पांगरी येथे दीड लाखांचा चारा जळून खाक

सिन्नर : पांगरी येथे दीड लाखांचा चारा जळून खाक

पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी शिवारात शेतात साठवून ठेवलेला जनावरांचा सुमारे १२ ट्रॅक्टर ज्वारी व मक्याचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. शनिवारी (दि.२) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सदर शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

वावी-पांगरी दरम्यान शिंदे वस्तीजवळ आनंदा देवराम पांगारकर यांची वस्ती आहेत. रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पांगारकर यांच्या घरामागे असलेल्या चाऱ्याच्या गंजीतून धूर निघत असल्याची बाब बाजूच्या वस्तीवरील शेतकऱ्यांनी पाहिली. त्यांनी लागलीच पांगारकर कुटुंबांना निरोप देत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही मदतीसाठी आरडाओरड करून बोलावले.

दरम्यान वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीने पेट घेतल्याने क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला. जवळपास कुठेही पाण्याची सोय नसल्याने पांगारकर यांनी पांगरीचे सरपंच ज्ञानेश्वर पांगरकर यांचेमार्फत सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सुचित केले. मात्र, नगरपालिकेचा मोठा बंब नादुरुस्त असल्याने लहान बंब पाठवण्यात आला. रात्री एक वाजेच्या सुमारास पोहोचलेल्या या बंबाने आग विझवली. मात्र, तरीदेखील आग धुमसतच होती. बंबातील पाणी संपल्यानेव वीजपुरवठा बंद असल्याने हा बंब पुन्हा भरण्याची सोय झाली नाही. परिणामी अग्निशमन दलाचे जवान माघारी परतले.

सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे घटनास्थळी आले असता चाऱ्याच्या गंजीतून धुमसणारी आग पाहून त्यांनी पुन्हा नगरपालिका बंबास पाचारण केले. त्यानंतर आलेल्या मोठ्या बंबाने आग पुर्णतः विझवली. मात्र तो पर्यंत सगळा चारा खाक झाला होता. पांगारकर यांनी जनावरांसाठी सहा ट्रॅक्टर कडबा, सहा ट्रॅक्टर चारा साठवून ठेवला होता. तर मक्याच्या बिट्या (कणसे) देखील सहा ट्रॅक्टर साठवली होती. मात्र आगीने हा संपूर्ण चारा भस्मसात केला.

याबरोबरच शेजारी असणारे पीव्हीसी पाईप, शेती उपयोगाची लाकडी अवजारे देखील जळून खाक झाली. वावी पोलिसांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला असून यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तर सरपंच पांगारकर यांचे उपस्थितीत तलाठ्यांनी देखील नुकसानीचा पंचनामा केला आहे.

पांगारकर यांचा शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. आगामी काळात चाऱ्याची तजवीज म्हणून त्यांनी बाहेरून विकत घेऊन हा चारा साठवून ठेवला होता. मात्र आगीने होत्याचे नव्हते केल्याने त्यांना मोठ्या टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com