कौतुकास्पद! विवाह सोहळ्यातच नववधूवरांनी केले रक्तदान
स्थानिक बातम्या

कौतुकास्पद! विवाह सोहळ्यातच नववधूवरांनी केले रक्तदान

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक । औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित यांच्या आदर्श प्रस्तावातून नवोदित वर कल्पेश व वधू धनश्री यांचा विवाह नाशिक येथील लक्ष्मी धवल समाज मंगल कार्यालयात पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वरमाला टाकण्याअगोदर नवोदित दाम्पत्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन नाशिक येथील गुन्हे शाखेचे स.पो.नि. अभिजीत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ मंडळी, तरूण समाज बांधव यांचेही यात रक्तदान झाले. रक्तदात्यांमध्ये माणुसकी ग्रुपचे संस्थापक सुमित पंडित, गजानन क्षीरसागर, योगेश राऊत, प्रशांत म्हस्के, शुभम आव्हाड, रुपेश बडगुजर, राजेंद्र पंडित, शिवनारायन वैद्य, अभिजित सोनवणे, नंदू व्यवहारे, गोपाल मालकर आदींचा समावेश असून यात एकूण 21 दात्यानी रक्तदान केले.

या आदर्श पायंडा घालणार्‍या दोन्ही कुटुंबियांविषयी लग्नसोहळ्यात विशेष चर्चा होती. रक्तसंकलन कामी जे.डी. सी.बिटको हॉस्पिटल रक्तपेढीचे डॉ. जितेंद्र धनेश्वर, वर्षा माळवे, आदी सेवकांनी काम केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर राजपुत, देविदास पंडित, दिगंबर कानडे, शामराव पंडित, मिराबाई पंडित, पुजा पंडित, माणुसकी ग्रुपच्या सदस्यांनी मदत केली.

Deshdoot
www.deshdoot.com