Thursday, April 25, 2024
Homeनगर‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

अकोले (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या पाठोपाठ कोंभाळणे गावाला हा दुसरा सन्मान मिळाला. यामुळे अकोले तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचाही समावेश आहे.

राहीबाई पोपेरे या हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करीत आहेत. सुरवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे.

- Advertisement -

गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे.. अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. त्यांना जाहीर झालेला हा पद्मश्री पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.

मला जो पुरस्कार जाहिर झाला आहे तो मी आत्तापर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा असून बायफ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहचवता आले. या पुरस्काराने मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. मी सर्वांची आभारी आहे. मी शाळा शिकले नाही परंतु निसर्गाच्या शाळेने मला खूप काही शिकवले आणि निर्सगाचे नीतिमूल्ये जपत यापुढेही कार्य करत राहीन. माझ्या आदिवासी समाज आणि तमाम अकोले कारांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारते.
-बीजमाता राहीबाई पोपेरे, कोंभाळणे, ता.अकोले

- Advertisment -

ताज्या बातम्या