सावधान! आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची फेक वेबसाईट व्हायरल
स्थानिक बातम्या

सावधान! आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची फेक वेबसाईट व्हायरल

Gokul Pawar

नाशिक । आदिवासी विकास आयुक्तालयाचे बनावट संकेतस्थळ तयार करुन त्यामार्फत नोकर भरतीची जाहिरात टाकून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहायक आयुक्त अविनाश अशोक चव्हाण यांनी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फिर्याद दाखल केली आहे.

चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार 18 फेब्रुवारीपासून अज्ञात संशयिताने फसवणूक करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास आयुक्तालयाचे बनावट संकेतस्थळ तयार केले. संशयिताने http://mahatribal.webs./ या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करुन आदिवासी आयुक्तालयात विविध पद भरती प्रक्रिया सुरु असल्याची जाहिरात दिली. त्यात कनिष्ठ अभियंता, सिव्हील इंजिनिअर असिस्टंट, पर्यवेक्षक, लॅबरोटरी असिस्टंट, शिपाई अशा पदांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव या शहरांमध्ये जागा असल्याचे या जाहिरातीत सांगण्यात आले.

तसेच या पदासांठी परीक्षा शुल्क म्हणून खुल्या वर्गासाठी 500 रुपये तर राखीव वर्गासाठी 350 रुपये शुल्क असल्याचे लिहण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी लिंकही देण्यात आली. त्यामुळे बनावट संकेतस्थळावर पद भरतीची जाहिरात टाकून तरुणाईची आर्थिक फसवणूक व शासनाचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न भामट्याने केल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com