उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात; उसाच्या रसाला मागणी
स्थानिक बातम्या

उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात; उसाच्या रसाला मागणी

Gokul Pawar

नाशिक । उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शहाराच्या विविध रस्त्यांवरील रसवंतीगृहे गर्दीने फुलली आहेत. उसाचा ताजा रस प्यायल्याने सगळा ताणतणाव, थकवा दूर होऊन मनात नवचैतन्य संचारते, अशी प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत.

उन्हाचा चटका वाढला तशी रसवंतीतील लगबग वाढली आहे. ऊकाड्यात उष्णता कमी करून थकवा दूर करणारे सर्वांचे आवडते पेय म्हणजे उसाचा रस. शहरात काही दिवसांपासूनच रसवंत्या थाटण्यास सुरुवात झाली आहे. पण उन्हाचा पारा वाढताच रसवंतीतील गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील विविध भागात रसवंतीची दुकाने थाटलेली दिसून येत आहे. काही गरीब कुटुंब हातगाड्यावर उसाचा रस विकून उदरनिर्वाह करतात. बर्फ टाकलेला उसाचा रस 10 रु. ग्लास तर बिनाबर्फाचा 15 रु. ग्लास मिळतो. यासह जम्बो ग्लासमध्येही रस दिला जातो.

आपल्याकडे उसाच्या रसात लिंबू आणि काळे मीठ टाकून त्याची रंगत वाढवली जाते. भर उन्हात गल्लीबोळात फिरून हातगाडीवर रस विक्री करणार्‍यांच्या फेर्‍याही वाढल्या आहेत. हाताने रस काढताना होणारे शारीरिक श्रम वाचवण्यासाठी रसवंतीच्या धर्तीवर हातगाड्यांवरच आकाराने लहान मशीनचा उपयोग होऊ लागला आहे. दिवसाला दोन ते तीन लिटर इंधनाचा वापर करून मशीनद्वारे रस काढला जातो. काही रसवंत्या वर्षभरही चालवल्या जातात. तर उन्हाळ्यात व्यवसाय म्हणून चार महिन्यांसाठी गुंतवणूक करून रसवंती थाटणार्‍यांची संख्याही चांगलीच वाढली आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह
आम्ही बीड जिल्ह्यातून आलो आहोत. आमच्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. रोजगारच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हाच व्यवसाय सुरू आहे. त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.
– किरण जगदाळे, रस विक्रेता

शहरातील मेनरोड, कॅनडा कॉर्नर, पंचवटी, नाशिकरोड, आग्रा रोड, मखमलाबाद रोड यासह अमृतधाम, मेहेरधाम, उपनगर, द्वारका, सीबीएस, जीपीओ यासह अन्य परिसरात रसवंतीच्या दुकानांत गर्दी वाढू लागली आहे. तसेच विविध कॉलनी परिसरात फिरत्या रसवंतीच्या घुंगरांचा नाद कानी पडायला लागला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com