रमजान पूर्वी सर्व गरजूंना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होणार : मंत्री दादा भुसे

रमजान पूर्वी सर्व गरजूंना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होणार : मंत्री दादा भुसे

नाशिक : येत्या २४ एप्रिल पासून रमजान सारख्या पवित्र धार्मीक सणाची सुरवात होणार आहे. त्या अनुषंगाने शासनामार्फत गरजू लाभार्थ्यांना त्यापुर्वी संपुर्ण लाभ मिळावा यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरात पुरवठा होत असलेल्या भाजीपाला व दुध व अत्यावश्यक सेवा यांचे नियेाजन त्यांनी उपस्थितांकडून जाणून घेतले.

तर शहरातील सर्व नगरसेवकांमार्फत त्यांच्या प्रत्येक वार्ड मधील जे लोक शासनाच्या लाभापासून वंचित आहेत अशा कुटूंबांची यादी तयार करून त्यांना सेवाभावी संस्थाकडून मिळणारी मदत पोहचविण्याचे नियोजन करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मालेगाव शहरातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासनामार्फतही चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. आरोग्य प्रशासनास कुठल्याही साधन सामुग्रीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यानंतर जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी सर्व विभाग प्रमुखांना सॅनिटायझर व ट्रिपल लेयर मास्क त्यांच्या हस्ते वितरण केले. तद्नंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिबंधीत क्षेत्रासह बडी मालेगाव हायस्कुल व मन्सुरा हॉस्पिटलची पाहणी करत केलेल्या उपाययोजना व सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली. पोलिस प्रशासनासह आरोग्य प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी समाधान व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com